सोनीपत (हरियाणा) : घरामध्ये सासू सुनेमध्ये खटके उडणे ही सामान्य बाब झाली आहे. लहानसहान कारणांमुळे वाद झाल्याचं आपण आपल्या आजूबाजूला पाहतो. पण हरियाणाच्या सोनीपतमध्ये एका सुनेने सासूला बेदम मारहाण केली. या मारहाणीचं कारण होतं, एक रोटी जास्त खाणं. तीन वर्षाच्या नातवाच्या आग्रहाखातर एक रोटी जास्त खाल्ल्याने सुनेने सासूला जबरदस्त मारहाण केली. मारहाणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सून आणि तिच्या भावाला अटक केली आहे.


मारहाणीचा हा प्रकार गणौर भागातील बडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या संदल खुर्द गावातील आहे. इशवंती या 75 वर्षीय वृद्धेला तिची सून मनिषाने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावर कारवाई करत पोलिसांनी आरोपी महिला मनिषा आणि तिच्या भावाला अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर करुन कारागृहात पाठवण्यात आलं आहे.


एक जास्तीची रोटी खाल्ल्याने मारहाण
नातवाने दिलेली एक रोटी जास्त खाल्ल्याने सुनेने वृद्ध सासूला मारहाण केल्याचा आरोप आहे. 75 वर्षीय सासूने आपल्या तक्रारी म्हटलं आहे की, "माझ्या मुलाचं आणि मनिषाचं लग्न झालं आहे. त्यांना तीन वर्षांचा मुलगा आहे. सून मला दोन्ही वेळी दोन रोट्या खायला देते. पण पाच दिवसांपूर्वी मी दोन रोट्या खाल्ल्या होत्या. पण तीन वर्षांच्या नातवाने मला आणखी एक रोटी आणून दिली. त्याच्या आग्रहामुळे मी ती रोटी खाल्ली. याचा राग आल्याने सुनेने आपल्याला बेदम मारहाण केली."


सुनेची सासूला अनेकदा मारहाण
मारहाणीचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, "एक सून आधी तिच्या सासूला घराच्या गेटवर मारहाण करत आहे आणि काही वेळानंतर ती तिला घरातही मारहाण करत आहे. वृद्ध महिला अतिशय दुःखी आणि घाबरलेली आहे." व्हिडिओमध्ये दिसत आहे की, "वृद्ध महिलेचा मुलगाही तिच्या आईला सोडवण्यासाठी येतो, पण सून त्याच्यावरही रागावते."


पोलिसांची कारवाई
या वृद्ध महिलेला तिच्या सुनेने पाच दिवसांपूर्वी मारहाण केल्याची माहिती आहे. सुनेच्या मारहाणीमुळे त्रस्त झालेल्या या वृद्ध महिलेने अखेर पोलिसांत तक्रार केली. यानंतर पोलिसांनी कारवाई करत क्रूर सुनेला आणि तिच्या भावाला अटक केली.