Video Viral : सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होताना दिसतात. मात्र, यावेळेस प्रवासादरम्यान ट्रेनच्या स्लीपर कोचमध्ये नमाज अदा केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ट्रेनमध्ये एकामागे चार लोक नमाज अदा करत आहेत, हे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. यादरम्यान बर्थवर बसलेला दुसरा तरुण प्रवाशांना आत येण्यापासून रोखत आहे.
काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, प्रवाशांची अडवणूक करत चक्क रेल्वेच्या डब्यात चार लोक नमाज अदा करताना दिसत आहेत आणि सीटवर बसलेला एक व्यक्ती हात हलवून लोकांना थांबायला सांगत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेला व्हिडिओ खड्डा रेल्वे स्थानकाचा आहे, जिथे काही लोक चक्क सत्याग्रह एक्सप्रेसमध्ये नमाज अदा करत आहेत. ही बाब निदर्शनास आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने व्हिडीओची चौकशी करण्यास सांगितले आहे. नमाज अदा करणारे कोण आणि कुठे आहेत हे सध्या तरी कळू शकलेले नाही.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू
रेल्वेच्या डब्याच्या कॉरिडॉरमध्ये लोक नमाज पठण करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. माहितीनुसार, व्हायरल झालेला व्हिडीओ सत्याग्रह एक्स्प्रेस (15273) चा असल्याचे सांगितले जात आहे, ज्याचे काही दिवसांपूर्वी कुशीनगर येथील खड्डा रेल्वे स्थानकावर ट्रेन थांबल्यावर शूटींग करण्यात आले होते. या प्रकरणी अद्याप कोणतीही एफआयआर नोंदवण्यात आलेली नाही, परंतु रेल्वे पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून या प्रकरणाबाबत कोणतीही लेखी तक्रार आल्यास एफआयआर नोंदवण्यात येईल, असे त्यांचे म्हणणे आहे.
लेखी तक्रार मिळाल्यानंतर लगेचच एफआयआर दाखल करणार - पोलीस
ईशान्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी पंकज कुमार सिंह यांनी सांगितले की, 'रेल्वेच्या डब्यात नमाज अदा करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओची पडताळणी केली जात आहे. रेल्वे पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्यास सांगण्यात आले आहे. सरकारी रेल्वे पोलिस (जीआरपी) चे पोलिस अधीक्षक अवधेश सिंह म्हणाले, "आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत आणि प्रवासादरम्यान प्रवाशांना काही समस्या आल्यास, लेखी तक्रार मिळाल्यानंतर लगेचच एफआयआर दाखल केला जाईल."
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहे. काही जणांकडून या व्हिडीओला पाठिंबा मिळतोय. तर काही जणांकडून याचा कडाडून विरोध होताना दिसत आहे.