Viral News : पंजाबमधील पुरात बचावकार्य करत असलेला जगजित सिंग आपल्या मिशनमध्ये गुंतला होता. तो लोकांना मदत करत होता आणि त्यांना पुरातून बाहेर काढण्यासाठी काम करत होता. त्याला कल्पना नव्हती की या उदात्त कार्याचे आपल्याला असे फळ मिळेल जी त्याच्या आयुष्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी ठरेल. गेल्या आठवड्यात, एका मिशनने त्याचा मार्ग बदलला आणि 35 वर्षांनी त्याला त्याच्या आईची भेट झाली. त्याला लहानपणापासून आई-वडिलांचा अपघाती मृत्यू झाल्याचे सांगितले जात होते. जगजीत सिंग 20 जुलै रोजी पटियाला येथील एका गावात आपल्या आजी-आजोबांच्या घरी पोहोचला आणि तीन दशकांनंतर आपल्या आईला पाहून अश्रू आवरता आले नाहीत. आई-मुलाचे हे मिलन पाहून आज प्रत्येक जण भावुक झाला आहे.


जगजीत सिंग यांनी त्यांची आई हरजीत कौर यांच्यासोबतची ही भेट तब्बल तीन दशकांनंतर फेसबुकवर रेकॉर्ड केली. त्याने लिहिले की, तो आणि त्याची आई आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत आणि एकमेकांना मिठी मारून रडले.


हरजीतचे दुसरे लग्न झाले


जगजीत सहा महिन्यांचा होता तेव्हा त्याचे वडील वारले. हरजीत कौर खूपच लहान होती त्यामुळे तिच्या पालकांनी तिचे दुसरे लग्न केले. हरजीतच्या दुसऱ्या लग्नानंतर आजोबांनी त्याला सोबत घेतले. तेव्हा जगजीत दोन वर्षांचा होता. तो मोठा झाल्यावर त्याच्या आई-वडिलांचा अपघाती मृत्यू झाल्याचे त्याला सांगण्यात आले. या सत्यासह ती आणि तिचा मुलगा जगत होते.


त्याच्या आयुष्याला अचानक कलाटणी मिळाली. तो पटियालातील एका NGO करता काम करू लागला. NGO द्वारे तो पूरग्रस्तांना मदत करत होता. येथे आपल्या कार्यात तो चांगलाच गुंतला होता. 'जेव्हा मी पटियालामध्ये बचाव मोहिमेवर होतो, तेव्हा माझ्या एका मावशीने मला सांगितले की माझ्या आजीचे घरही पटियालामध्ये आहे, असे त्याने सांगितलं.  


आई जिवंत असल्याचे कळले


जगजीत लवकरच बोहरपूरला पोहोचला आणि त्याची आजी प्रीतम कौर यांची भेट घेतली. त्याठिकाणी गेल्यानंतर जगजीतला कळाले की, त्याची आई जिवंत आहे. तो तिचा पहिला मुलगा आहे. हरजीत कौर यांना पायाच्या आजाराने ग्रासले आहे, त्यांना चालता येत नाही. जगजीतने सांगितले की, त्यांना पाच वर्षांपूर्वीच त्यांची आई जिवंत असल्याचे समजले. जगजीत म्हणाला, 'पण माझ्याकडे फारशी माहिती नव्हती. त्यामुळे मला काही करता आले नाही.


2014 मध्ये आजोबांचेही निधन झाले


जगजीतने सांगितले की, त्याचे वडिलांचे आई-वडील आणि आईचे आई-वडील यांचे नाते चांगले नव्हते. त्यामुळे दोन्ही कुटुंबातील संबंध तुटले. यामुळे आईच्या आई-वडिलांशी कधीच संपर्क झाला नाही. जगजीतने मॅट्रिक पास केल्यानंतर 2014 मध्ये आजोबांचे निधन झाले. तो म्हणाला, 'लहानपणीचे काही फोटो बघितल्यावर एका चित्रात मला एक स्त्री दिसली, ती माझी आई आहे हे मला माहीत नव्हते. मी माझ्या आजोबांना विचारायचो आणि ते मला सांगायचे की माझ्या आई-वडिलांचा कार अपघातात मृत्यू झाला आहे.