Irshalwadi Landslide: रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीवर (Irshalwadi Landslide) बुधवारी (19 जुलै) रात्री साडेदहा ते अकरा वाजताच्या सुमारास दरड कोसळून दुर्घटना घडली. गावातील अर्धी घरं दरडीखाली चिरडली गेली. इर्शाळवाडी (Irshalwadi) येथील घटनेला आज तीन दिवस झाले. आजही सकाळपासून शोध मोहिमेला सुरुवात झाली आहे. दुर्घटनेत आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे, कालपर्यंत ही संख्या 22 वर होती. आज सकाळी आणखी दोन महिलांचे मृतदेह मिळाले आहेत. दुर्घटनेत 100 पेक्षा अधिक जणांचे प्राण वाचले आहेत. 86 जण अजूनही बेपत्ता असल्याचं सांगण्यात येत आहे.


प्रशासनाकडून दिवस-रात्र घटनास्थळी काम सुरू आहे. NDRF ची टीम अजूनही ढिगाऱ्याखालील मृतदेह काढण्यात व्यस्त आहे. मुसळधार पावसामुळे यात अडथळे येत आहेत. डोंगरावर मध्यभागी असलेल्या इर्शाळवाडी या गावाला आधीपासूनच अनेक समस्यांना सामोरं जावं लागत होतं. गावात जाण्यासाठी रस्ता नाही, वीज देखील नाही, सौरऊर्जेच्या अपुऱ्या प्रकाशात गावाला दिवस काढावे लागत होते. प्राथमिक शिक्षणाचीही सोय नसल्यामुळे पहिलीपासून मुलांना आश्रमशाळेत टाकलं जात होतं.


ढिगाऱ्याखाली आणखी किती जण असतील हे सांगणं कठीण


मातीच्या ढिगार्‍याखारी आणखी किती जण आहेत याचा आकडा सांगणं कठीण असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितलं. तर आणखी किती जण बेपत्ता आहेत याची स्थानिकांकडून माहिती घेत आहोत, असंही ते म्हणाले. तर, नढाळ या ठिकाणी मृतांच्या नातेवाईकांना ठेवलं आहे आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पुढील काम केलं जाईल, असं ते म्हणाले.


पुढील आदेशापर्यंत बचावकार्य सुरुच राहणार


इर्शाळवाडीत हे सर्च ऑपरेशन आणखी किती दिवस पार पाडायचं आहे या संदर्भात वरिष्ठांच्या आदेशानुसार निर्णय घेतला जाईल, असंही अप्पर पोलीस निरीक्षक म्हणाले. तर बचाव कार्य अधिक वेगाने व्हावं यासाठी पूर्ण प्रयत्न केला जातोय, असंही ते म्हणाले. अगदी पहिल्या दिवसापासून बचाव कार्य सुरू आहे, एनडीआरएफ सोबत टीडीआरएफ काम करत आहे आणि पुढील सूचना मिळेपर्यंत बचाव कार्य सुरुच राहील, असं सांगण्यात आलं आहे.


अनाथ मुलांचं पालकत्व घेण्यासाठी स्वयंसेवी संस्थेचा पुढाकार


इर्शाळवाडी दुर्घटना झालेल्या ठिकाणी अनेक स्वयंसेवी संस्था मदतीसाठी पुढाकार घेताना पाहायला मिळत आहेत. इर्शाळवाडी दुर्घटनेत आई-वडील गमावलेल्या अनाथ मुलांचं शैक्षणिक पालकत्व घेण्यास स्वयंसेवी संस्थेने पुढाकार दर्शवला आहे. पुण्याच्या भोई फाऊंडेशनने या दुर्घटनेत आई-वडील गमवलेल्या अनाथ मुलांचं शैक्षणिक पालकत्व घेण्याचा निर्णय घेतला आहे. या दुर्घटनेत अनाथ झालेल्या मुलांचं संपूर्ण शिक्षण ही संस्था करणार असून प्रशासनाकडून या मुलांची यादी मागवली गेली आहे. एकीकडे शैक्षणिक पालकत्व या संस्थेने घेतलं असून दुसरीकडे या संस्थेचे कार्यकर्तेही घटनास्थळी जाऊन फवारणीचं काम करत आहेत.


दुर्घटनास्थळी औषध फवारणी


इर्शाळवाडीची दुर्घटना होऊन तीन दिवसांहून अधिक कालावधी उलटल्याने परिसरात दुर्गंधी सुटली आहे. सध्या शोधमोहीम सुरू असल्याने हजारो जण याठिकाणी मदतकार्य करत आहेत. दुर्गंधीमुळे रोगराई पसरू नये, यासाठी परिसरात औषध फवारणी करण्यात आली आहे.


मृत व्यक्तींची नावं


१) विनोद भगवान भवर, (पुरुष) वय - ०४ वर्ष
२) रमेश हरी भवर, (पुरुष ) वय-२५ वर्ष
३) जयश्री रमेश भवर, (स्री) (वय)- २२ वर्ष
४) रूद्रा रमेश भवर, (पुरुष) वय - o१ वर्ष
५) जीजा भगवान भवर, (पुरुष) वय- २३ वर्ष
६) आंबी बाळू पारधी, वय - ४५ वर्ष
७) बाळू नामा पारधी, (पुरुष) वय - ५२ वर्ष
८) सुमित भास्कर पारधी, (पुरुष) वय - ०३वर्ष
९) सुदाम तुकाराम पवार, (पुरुष ) - १८वर्ष
१०) दामा सांगू भवर, (पुरुष) वय- ४०वर्ष
११)चंद्रकांत किसन वाघ, (पुरुष) वय -१७वर्ष
१२) राधी रामा भवर, (स्री)वय -३७ वर्ष 
१३) बाळी नामा भूतब्रा, (स्री) - ३० वर्ष
१४) भास्कर बाळू पारधी, (पुरुष) - ३८ वर्ष
१५)पिंकी (ऊर्फ) जयश्री भास्कर पारधी, (स्री) वय - माहीत नाही
१६) अन्वी भास्कर पारधी,(स्री) वय - ०१ वर्ष
१७) कमल मधु भुतांब्रा, (स्री) वय- ४३ वर्ष
१८) कानी रवी वाघ, (स्री) वय- ४५ वर्ष
१९) हासी पाडुरंग पारधी, (स्री) वय - ५० वर्ष 
२०) पाडुरंग धाऊ पारधी, (पुरूष) वय- ६० वर्ष
२१) मधु नामा भुतांब्रा, (पुरुष) वय- ४५ वर्ष
२२) रविंद्र पदु वाघ, पुरूष (वय)- २४ वर्ष
२३)हासी पांडुरंग पारधी, (स्त्री) वय - ४५ वर्ष
२४) पिंकी संदेश पारधी, (स्त्री) वय - माहीत नाही


हेही वाचा:


Irshalwadi Landslide: इर्शाळवाडी नेमकं कशासाठी प्रसिद्ध आहे? आणि बहुसंख्य लोक दरवर्षी तिथे का जातात? पाहा...