Valentine Day Love Story: प्रेम आंधळ असतं... प्रेमात सर्वकाही माफ असतं, अशी पालुपदं आपण नेहमीच ऐकतो. खरं प्रेम, जीवापाड प्रेमाची उदाहरणं सांगणाऱ्या अनेक कहाण्याही आपण ऐकल्यात. अशीच एक कहाणी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतेय. ही कहाणी आहे, इंग्लंडची हॅना हॉबिट आणि आग्र्याच्या पालेंद्रची.
एखादी व्यक्ती प्रेमात पडली, तर ती जग विसरते. वेळप्रसंगी आपल्या प्रेमासाठी सर्वकाही सोडण्याचीही त्या व्यक्तीची तयारी असते. इंग्लंडच्या (England) हॅना हॉबिटनंही तेच केलंय. हॅना हॅबिटची सोशल मीडियाच्या माध्यमातून आग्रा (Agra) येथील एका गावात राहणाऱ्या पालेंद्रसोबत मैत्री झाली. हळूहळू मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. कालांतरानं एकमेकांवर जीव जडला आणि हॅनानं इंग्लंडमधील तिचं सुखवस्तू आयुष्य सोडून पालेंद्रसाठी आग्र्याची वाट धरली. पालेंद्र आणि हॅनानं आपली लग्नगाठ बांधली आणि आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला.
परदेशी सून मिळाल्यानं पालेंद्रच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. तर, दुसरीकडे एक परदेशी मुलगी सून म्हणून आग्र्यातील गावात राहायला आल्यानं तिची चर्चा संपूर्ण शहरात होतेय.
दोघांची अनोखी प्रेम कहाणी
लॉकडाऊन दरम्यान हॅना हॅबिट आणि पालेंद्र यांचं सोशल मीडियाद्वारे सूत जुळलं. लॉकडाऊनच्या वेळी पालेंद्र घरून काम करत होता आणि त्या काळात सोशल मीडियावर तो खूप सक्रिय होता. पालेंद्र त्याच्या फेसबुकवर हिंदू धर्माच्या प्रचाराशी संबंधित गोष्टी शेअर करायचा. आधीच हिंदू धर्माकडे आकर्षित झालेल्या इंग्लंडच्या हॅना हॅबिटला पालेंद्रच्या पोस्ट खूप आवडू लागल्या. हळूहळू दोघांमधील संवाद वाढत गेला आणि नंतर या संवादाचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांचा एकमेंकावर इतका जीव जडला की, हॅना हॅबिट पालेंद्रशी लग्न करण्यासाठी इंग्लंडहून आग्र्याला आली. त्यानंतर दोघांनी आग्र्यातच लग्नगाठ बांधली आणि पालेंद्रच्या गावात हॅना हॅबिट पालेंद्रसोबत राहू लागली.
एकत्र कुटुंबात राहतो पालेंद्र
पालेंद्र एकत्र कुटुंबात राहतो. त्याच्यासोबत त्याचे आई-वडील, आजी आणि भावंडंही राहतात. आता लग्नानंतर इंग्लंडची हॅना हॅबिट देखील या घरात संपूर्ण कुटुंबासह एकत्र राहतेय. पालेंद्रच्या कुटुंबातील सदस्यांना इंग्रजी चांगलं येत नाही, त्यामुळे ते हॅना हॅबिटशी फारसं बोलू शकत नाहीत. पण हळूहळू हॅना हॅबिट हिंदीही शिकतेय. लग्नानंतर हॅना हॅबिट भारतीय परंपरा शिकतेय. ती दररोज सकाळी उठते आणि आदर्श सूनेसारखी सगळी घरातील कामं करते. हॅना हॅबिटसारखी सून मिळाल्यामुळे पालेंद्रचे कुटुंबीय खूपच खूश आहेत.
परदेशी मुलगी गावची सून झाल्यानं गावकरीही खूश
पालेंद्रनं इंग्लंडमधील मुलीशी विवाह केल्याची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण गावात पसरली. संपूर्ण आग्र्यात ही बातमी चर्चेचा विषय बनली. तेव्हापासूनच गावकरी पालेंद्र आणि हॅनाची प्रेमकहाणी जाणून घेण्यासाठी फार उत्सुक होते. पालेंद्रचे गावकरी परदेशी मुलगी सून बनून गावात आल्यानं खूपच खूश आहेत. त्यांच्या गावात परदेशी सून आल्याची ही पहिलीच वेळ आहे. हॅना हॅबिट लवकरच भारतीय नागरिकत्व घेऊन, पालेंद्रसोबत त्याच्या गावात कायमची राहणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :