Viral Video : बिहारच्या (Bihar) मुझफ्फरपूरमध्ये (Muzaffarpur) दोन ट्रेन तिकीट चेकरनी (TTE) प्रवाशाला (Passenger) मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर रेल्वेने कारवाई केली आहे. प्रवाशाला बेदम मारहाण करणाऱ्या या दोन्ही टीटीईंना तात्काळ निलंबित करण्यात आलं असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं सीपीआरओने सांगितलं. दरम्यान दोन ट्रेन तिकीट चेकर प्रवाशाला लाथांनी मारत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


व्हायरल झालेला व्हिडीओ बिहारमधील मुजफ्फरपूरचा असल्याचं कळतं. या दोन टीटीईंनी ट्रेनमधील एका प्रवाशाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. टीटीईने प्रवाशाला ट्रेनच्या वरच्या सीटवरुन खाली खेचलं आणि नंतर त्याच्या चेहऱ्यावर आणि छातीवर अनेक वेळा लाथ मारली. ट्रेनमधील इतर प्रवासी आरडाओरडा करत राहिले मात्र दोन्ही टीटीईंनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत प्रवाशाला बेदम मारहाण केली.


मुंबईहून जयनगरला जाणाऱ्या ट्रेनमधील प्रकार


ही घटना 2 जानेवारीच्या रात्रीची आहे. ही ट्रेन मुंबईहून जयनगरला जात होती. मुझफ्फरपूरच्या ढोली स्टेशनजवळ पवन एक्सप्रेस ट्रेनमध्ये ही घटना घडली. संबंधित प्रवाशाकडे तिकीट नव्हते आणि टीटीई तिकीट तपासण्यासाठी पोहोचले तेव्हा प्रवाशी आणि टीटीई यांच्यात बाचाबाची झाली. यानंतर टीटीईने पहिल्यांदा प्रवाशाला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला, तो खाली न उतरल्याने टीसीचा सहकारी त्याच्या मदतीला आला. दोघांनी प्रवाशाचे पाय पकडून त्याला सीटवरुन खाली ओढलं आणि नंतर त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.


टीसींच्या मारहाणीत प्रवासी गंभीर जखमी


ट्रेनमध्ये बसलेले इतर प्रवासी तिकीट चेकरला मारहाण करण्यापासून अडवत होते, पण ते थांबले नाहीत. अखेर प्रवाशांनी मध्ये पडून टीटीईला मारहाण करण्यापासून रोखलं. तुम्हाला प्रवाशाला मारहाण करण्याचा कोणताही अधिकार नाही, असं टीटीई सांगितलं. दरम्यान या मारहाणीत प्रवासी गंभीर जखमी झाला. टीटीईचे हे कृत्य पाहून इतर प्रवासी संतप्त झाले आणि त्यांनी ट्रेनमध्ये गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यादरम्यान आरपीएफच्या पथकाने ट्रेन गाठली आणि जखमी प्रवाशाला बाहेर काढले. यादरम्यान एका प्रवाशाने या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ बनवला.






व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोन्ही टीटीई तात्काळ निलंबित


तर दुसरीकडे हा टीटीईने प्रवाशाला केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने पाऊल उचललं. दोन्ही तिकीट चेकरला तात्काळ निलंबित केलं. तसंच त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असंही सांगितलं.


हेही वाचा


रेल्वे स्टेशनवर मृत आईला उठवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिमुकल्याच्या मदतीसाठी शाहरुख खान सरसावला