बिहार:  जगात आपण अनेक यशस्वी लोकांच्या गोष्टी ऐकल्या आहेत. अनेकांना आपल्या वाईट परिस्थितीला मात देत यशापर्यंत पोहचलेले आपण बघितले आहे. आता आम्ही जर तुम्हाला सांगितलं, की एक रिक्षाचालक आयआयटी, आयआयएम पदवीधारकांना नोकरी देतोय. तर, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे शक्य करून  दाखवलं आहे, बिहारमधील एका तरुणाने... या तरुणाचे नाव आहे दिलखुश कुमार. दिलखुशने आपल्या स्टार्टअपच्या माध्यमांतून अनेक पदवीधारकांना नोकरी दिली आहे.


दिलखुश हा बारावी पास आहे. यापूर्वी तो रिक्षा चालवायचा आणि भाजीपाला विक्री करायचा. आता त्याने स्वत:ची स्टार्टअप कंपनी निर्माण केली आहे. सुरुवातीला त्याने एक सेकंड हँड कार घेऊन स्टार्टअपची स्थापना केली आणि आता त्याची ही कंपनी कोट्यवधी रुपयांची झाली आहे. त्याच्या या कंपनीचे नाव 'रॉडबेझ' आहे.  त्याने आपल्या कंपनीत आयआयटीयन्सची नियुक्ती केली आहे. तर काही आयआयएम पदवीधरही त्याच्या स्टार्टअपसाठी काम करत आहेत. दिलखुश कुमार हा बिहारमधील एका छोट्या गावातील असून तो रिक्षाचालक आणि भाजीविक्रेता होता. पण, आता तो 'रॉडबेझ' या कोट्यवधी  रुपयांच्या कंपनीचा संस्थापक आणि सीईओ आहे. 


'रॉडबेझ' या नावाने आपल्या स्टार्टअपची सुरुवात


दिलखुशला स्वतःचे काहीतरी सुरू करायचे होते. त्यामुळे त्याने बिहारमध्ये टॅक्सी सेवा देण्याचे ठरवले. दिलखुशने 'रॉडबेझ' या नावाने आपल्या स्टार्टअपची सुरुवात केली. त्याची कंपनी ही एक डेटाबेस कंपनी आहे. जी ग्राहकांना टॅक्सी चालकांशी जोडते आणि 50 किमीपेक्षा जास्त अंतराच्या बाहेरच्या प्रवासासाठी ग्राहकांना  वाहने पुरवते. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, आयआयटी गुवाहाटीसारख्या संस्थांमधील पदवीधरांना 'रॉडबेझ'मध्ये काम करण्यासाठी नियुक्त केल्यानंतर त्यांनीही त्याच्या या स्टार्टअपला पाठिंबा दर्शविला. तसेच आयआयएममधील काही विद्यार्थीही पार्टटाईम तत्त्वावर त्याच्या स्टार्टअपमध्ये सामील झाल्याचे दिलखुश सांगतो. 


आयफोनही माहित नव्हता


जुन्या आठवणींना उजाळा देत भावूक होऊन दिलखुशने सांगितले, की तो पूर्वी दिल्लीत रिक्षा चालवत होता आणि पटनामधील रस्त्यांवर भाजीपाला विकत होता.  जेव्हा तो गार्डच्या नोकरीसाठी मुलाखतीसाठी गेला तेव्हा त्याला अशिक्षीत समजले गेले. एकदा दिलखुशला आयफोनचा लोगो देखील ओळखण्यास सांगितले होते. जो तो ओळखू शकला नाही. कारण तो पहिल्यांदाच आयफोन पाहत होता. त्याला या गोष्टीचं वाईट वाटायचं पण कुटुंबाची जबाबदारी असल्याने त्याने कधीच हार मानली नाही.


'रॉडबेझ'साठी चार कोटींपर्यंतचा निधी उभारण्यात यश


दिलखुशने आपल्या वडिलांकडून गाडी चालवायला शिकला. त्याचे वडील हे एक बस ड्रायव्हर होते. पैशांच्या अभावी त्याचे 12 वी पर्यंतच शिक्षण झाले आहे.  पैसे कमावण्यासाठी त्याने गाडी चालवायला सुरुवात केली. दिलखुशने सेकंड हँड टाटा नॅनोसारख्या गाडीतून आपल्या स्टार्टअपची सुरुवात केली. त्याच्या 'रॉडबेझ' कंपनीच्या सुरुवातीनंतर अवघ्या सहा ते सात महिन्यात त्याला आणि त्याच्या टीमला 'रॉडबेझ'साठी चार कोटींपर्यंतचा निधी उभारण्यात यश आले. सध्या त्याच्या कंपनीने पटना ते बिहारमधील प्रत्येक गावात सेवा देण्यास  सुरुवात केली आहे. हळूहळू ही सेवा वाढवून बिहारच्या बाहेरसुद्धा सेवा पुरविण्याचा त्याचा प्लॅन आहे.


त्याच्या 'रॉडबेझ' कंपनीचा सर्वात चांगला भाग म्हणजे जे स्टार्टअप ड्रायव्हर्स आहेत त्यांना देण्यात येणारा मोबदला. कारण दिलखुशला ड्रायव्हर लोकांच्या आयुष्याची
जाणीव आहे. त्यामुळे तो त्याच्या कंपनीद्वारे त्यांना दरमहा 55,000 ते 60,000 रुपये कमविण्याची संधी देतो.