Trending News : बिहारमध्ये तरुणीच्या जबरदस्तीने लग्न केल्याबद्दल तुम्ही ऐकले असेलच. यामध्ये मुलाला जबरदस्तीने उचलून बंदुकीच्या जोरावर किंवा मुलाला ड्रग्ज देऊन हे लग्न केले जाते. यावर बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटही बनले आहेत, ज्यात नुकतेच बनलेले ‘जबरिया जोडी’ आणि ‘अतरंगी इश्क’ हे उदाहरण सर्वांसमोर आहे. असेच एक प्रकरण बिहारमधील बेगुसराय येथून समोर आले आहे. डॉक्टर सत्यम एका प्राण्यावर उपचार करण्यासाठी घरातून निघाले होते. वाटेत त्यांचं अपहरण करून एका मंदिरात लग्न केल्याचा आरोप आहे.


लग्नाच्या व्हिडिओ पाहिल्यानंतर कुटुंबात खळबळ


तेघरा पोलिस स्टेशन हद्दीतील पिधौली गावातील हे प्रकरण आहे. मंगळवारी सकाळी पिधौली गावातील रहिवासी सुबोध कुमार झा यांच्या मोबाईलवर एक व्हिडिओ पाठवण्यात आला. हा व्हिडिओ त्यांचा मुलगा सत्यमच्या लग्नाचा होता. व्हिडिओमध्ये एक मुलगी सत्यमसोबत बसली होती आणि एक पंडित मंत्र पठण करत होता. आजूबाजूला लोकांची गर्दी होती आणि लग्नाचे विधी चालू होते.


जबरदस्तीने लग्न केल्याची तक्रार


व्हिडिओ पाहिल्यानंतर कुटुंबात खळबळ उडाली. सोमवारी दुपारी डॉक्टर सत्यम कुमार प्राण्यांच्या उपचारासाठी घराबाहेर पडले होते आणि रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाहीत, असा आरोप या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी केला आहे. हसनपूर गावातील विजय सिंहने सत्यमचे अपहरण करून त्यांचे लग्न लावल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यानंतर तरुणाच्या कुटुंबीयांनी तेघरा पोलिस ठाण्यात मुलाचे अपहरण करून जबरदस्तीने लग्न केल्याची तक्रार दाखल केली आहे. सध्या सत्यम मिळाल्यावरच या संपूर्ण प्रकरणावरून पडदा हटणार आहे.


प्रेमप्रकरणाचा संशय


मात्र, पोलिस प्रेमप्रकरणाची शक्यता असल्याचं बोलत आहेत. तेघराचे एसएचओ संजय कुमार यांनी सांगितले की, हे प्रेमप्रकरण आहे की नाही याचा पोलिस तपास करत आहेत. गढपुरा पोलिस स्टेशन हद्दीतील मोदतर गावात मुलीच्या मावशीच्या घरात हा विवाह झाला. तरुणाच्या कुटुंबीयांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केल्यावर मुलीच्या कुटुंबीयांनी मुलगा आणि मुलीला तेथून घेऊन पळ काढला. आता सत्यम परतल्यावरच हे प्रकरण स्पष्ट होईल.