Dancer Lost Both Arms and Legs after Bitten by Mosquito : 'एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है...' अभिनेते नाना पाटेकर यांच्या 1997 साली आलेल्या यशवंत (Yeshwant) चित्रपटातील हा डायलॉग बहुतेक सर्वांनाच माहित आहे. डासांचा (Mosquito) त्रास झाल्यानंतर लोकांना हा डायलॉग नक्कीच आठवतो, पण हा डास यापेक्षाही अधिक धोकादायक ठरू शकतो, याचा तुम्ही विचारही केला नसेल. एका तरुणीसोबतही असंच काहीस घडलं. एका डासामुळे या डान्सर असलेल्या तरुणीला दोन्ही हात आणि पाय गमवावे लागले.
एका मच्छरमुळे तरुणी कोमात, गमावले दोन्ही हात आणि पाय
असं म्हणतात की आयुष्यात कधी आणि काय घडतं, काही सांगता येत नाही. डास हा एक साधा कीटक आहे, पण काही वेळा डास चावल्यामुळे अनेक आजार पसरतात. डास चावल्यामुळे अनेकांना रुग्णालयात दाखल करावे लागते. एका तरुणीला डास चावल्यामुळे रुग्णालयात दाखल करावं लागलं, ती कोमात गेली. पण तरुणीची तब्येत इतकी बिघडली की तिचे दोन्ही हात-पाय कापावे लागले.
नक्की काय घडलं?
लंडनच्या कँबरवेलमध्ये राहणारी टॅटियाना टिमॉनला (Tatiana Timon) डान्सची फार आवड आहे. एकेकाळी ती भल्याभल्यांना तिच्या तालावर नाचावायची. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, 2022 पूर्वी टॅटियाना खूप चांगली डान्सर होती. मे 2022 मध्ये, ती अंगोलामध्ये डान्स ट्रिपसाठी गेली होती. तिथे तिने 10 दिवस डान्सचं प्रशिक्षण घेतलं. यानंतर ती आपल्या देशात परतली. मात्र, देशात परतल्यानंतर काही दिवसांनी तिची प्रकृती खालावली. खरंतर तिला मलेरियाची लागण झाली होती, पण तिला हे माहित नव्हतं. कारण त्यावेळी कोरोनाची लाट होती, तिला वाटलं की आपल्याला कोरोना झालाय. त्यामुळे तिनं काही कोविडसाठी आवश्यक औषधे घेऊन गोष्टींकडे दुर्लक्ष केलं.
कापावे लागले दोन्ही हात-पाय
मात्र, नंतर हळूहळू ती अशक्त होऊ लागली. तिला चालणं आणि उभं राहणंही अवघड झालं. प्रकृती बिघडल्यानं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी तिला मलेरिया झाल्याचं सांगितलं. मात्र, तोपर्यंत हा संसर्ग खूप वाढला होता आणि परिस्थिती हाताबाहेर गेली होती. तिला सेप्सिस झाला होता. त्यानंतर ही कोमामध्ये गेली. डॉक्टरांनी सेप्सिस टाळण्यासाठी टॅटियानाचे दोन्ही पाय आणि हात कापण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीयांनी यासाठी होकार दिला. त्यानंतर तिचे हात आणि पाय कापावे लागले. हात-पाय कापल्यानंतर काही तासांनी ती पुन्हा शुद्धीवर आली आणि तिचे हात आणि पाय गायब असल्याचे पाहून ती थक्क झाली. त्यानंतर तिला सर्व प्रकरण सांगण्यात आलं.
स्वावलंबी बनण्यासाठी धडपड
मीडिया रिपोर्टनुसार, सुरुवातीला तिचे हात आणि पाय गायब असल्याचे पाहून ती खचली, पण नंतर तिने खंबीरपणे आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. आता ती दैनंदिन काम स्वतःहून करण्याचा प्रयत्न करत आहे. तिला स्वत:ला स्वावलंबी बनवायचं आहे.