Dishes Made With Blood: तुम्ही-आम्हीच नाही तर, आपल्यापैकी अनेक लोक हे स्वतःला ‘फूडी’ म्हणवतात. फूडी अर्थात वेगवेगळे पदार्थ खाण्याची सवय असणारे हे लोक.. असे लोक नेहमी हटके आणि वेगवेगळे पदार्थ आवर्जून चाखतात. आपणही एखाद्या ठिकाणी गेलो की, तिथला सगळ्यात प्रसिद्ध असणारा पदार्थ नक्की खातोच! बऱ्याचदा अशा खास पदार्थांमध्ये नेमके कोणते घटक, मसाले वापरले जातात ते मात्र गुलदस्त्यात ठेवलं जातं. जगभरातील अनेक ठिकाणं तिथे मिळणाऱ्या काही पदार्थांमुळेच ओळखली जातात. आजपर्यंत तुम्ही वेगवेगळ्या भाज्या आणि मांस वापरून बनवलेल्या पदार्थांबद्दल ऐकलं असेलच, पण कधी रक्तापासून बनवल्या जाणाऱ्या पदार्थांबद्दल ऐकलंय का? (Trending)
हो.. जगभरातील काही देशांमध्ये असे काही पदार्थ प्रसिद्ध आहेत, जे बनवण्यासाठी रक्ताचा वापर केला जातो. अर्थात हे रक्त मानवी नसून, प्राण्यांचं असतं. मात्र, हे रक्तंच या प्रदर्थातील मुख्य घटक असतो. ज्या प्राण्यांचे मांस आहारात समाविष्ट केले जाते, अशाच प्राण्यांचे रक्त यात वापरले जाते. चला तर जाणून घेऊया जगभरातील अशाच काही पदार्थांबद्दल...
शिलाँगचा ‘ब्लड राईस’
भारताचा एक भाग असलेले शिलाँग तिथल्या निसर्गसौंदर्यामुळे अधिक ओळखले जाते. याच ठिकाणचा ‘ब्लड राईस’ नावाचा एक पदार्थ स्थानिक लोकांमध्ये लोकप्रिय आहे. नावाप्रमाणेच या ‘ब्लड राईस’मध्ये डुकराची चरबी आणि रक्त वापरले जाते. ‘ब्लड राईस’ हा पदार्थ तेथील स्थानिक समाज, एखाद्या खास प्रसंगीच बनवतो.
थायलंडचे ‘बोट न्यूडल्स’
निसर्गरम्य थायलंडमध्ये खास बोटमध्ये सर्व्ह केला जाणारा हा पदार्थ म्हणजे ‘बोट नूडल्स’. या न्यूडल्स तयार करण्यासाठी बदक, डुक्कर, बीफ किंवा हंसाचे रक्त वापरले जाते. सोबतच या न्यूडल्समध्ये वेगवगेळ्या प्रकारच्या भाज्या, मासे आणि मांसदेखील असते.
चीनचे ‘ब्लड टोफू’
चीनमध्ये ‘ब्लड टोफू’ नावाचा पदार्थ अतिशय प्रसिद्ध आहे. हा पदार्थ बनवण्यासाठी ताज्या टोफूसोबतच बदक, डुक्कर किंवा कोंबडीच्या रक्ताचा वापर केला जातो. चीनमध्ये अनेक ठिकाणी हा पदार्थ प्रसिद्ध आहे. स्थानिक लोक या पदार्थात औषधी गुणधर्म असल्याचे सांगतात. तसेच, हा पदार्थ लोक औषध म्हणून देखील खातात.
स्वीडनचे ‘ब्लड पॅनकेक’
स्वीडनमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या या ‘ब्लड पॅनकेक’ला ‘ब्लड प्लॅटर’ देखील म्हटलं जातं. हा पदार्थ बनवण्यासाठी पॅनकेकच्या पीठामध्ये प्राण्यांचे रक्त, कांदा आणि काही मसाले टाकले जातात. हे मिश्रण व्यवस्थित मिसळून त्याचे पॅनकेक बनवले जातात. हा पदार्थ बेरी जामसोबत सर्व्ह केला जातो.
इटलीचे ‘सांगुईनाच्यो डोल्से’
इटलीत ‘सांगुईनाच्यो डोल्से’ नावाचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय असा गोड पदार्थ आहे. सांगुईनाच्यो डोल्से तयार करण्यासाठी चॉकलेटसोबतच प्राण्यांच्या रक्ताचा देखील वापर केला जातो. सांगुईनाच्यो डोल्से हे एक इटालियन पुडिंग आहे जे, चक्क डुकराच्या रक्तापासून बनवले जाते.
महत्वाच्या बातम्या :