Bengaluru Flood Viral Video : बंगळुरूमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू आहे. शहरातील बहुतांश भाग पाण्यात बुडाले आहे. यावेळी लोकांना शहराच्या सुरक्षित भागात हलवले जात होते. सोसायटीच्या अनेक भागात पाणी साचल्याने लोकांना ट्रॅक्टरच्या साहाय्याने बाहेर काढण्यात येत आहे. अशातच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे


ट्रॅक्टरवर बसवून कुटुंबाला बाहेर काढण्यात आले


मुसळधार पावसामुळे कर्नाटकच्या राजधानीचा आयटी भागच नाही, तर बेंगळुरू विमानतळाचेही नुकसान झाले आहे. बेंगळुरू विमानतळावरील रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने लोकांना शहरात ट्रॅक्टर घेऊन जाताना दिसले. त्याचवेळी अनॅकॅडमी या ऑनलाइन शिक्षण मंचाचे सीईओ गौरव मुंजाल आणि त्यांचे कुटुंबीयही पुरात अडकले. मात्र, कुटुंबासह त्यांच्या पाळीव कुत्र्याला ट्रॅक्टरच्या साहाय्याने सोसायटीबाहेर काढण्यात आले. त्यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे, त्यांनी लिहिले आहे की, ते ज्या सोसायटीत राहतात. ती सोसायटी पाण्याखाली बुडाली आहे. त्यांचे कुटुंब आणि त्यांचा पाळीव कुत्रा अल्बस यांना ट्रॅक्टरवर बसवून बाहेर काढण्यात आले आहे. त्यांनी लिहिले, इथली परिस्थिती खूप वाईट आहे, स्वतःची काळजी घ्या आणि काही मदत लागली तर मेसेज करा, मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. सोमवारी, अपग्रेडचे सीईओ अर्जुन मोहन यांनी माहिती दिली होती की ते ट्रॅक्टरने त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहोचले होते.


 






घरे, महागडी वाहने सर्व काही पाण्यात


बंगळुरूमधूनही इतर वसाहतींचे व्हिडीओ समोर येत आहेत, जिथे पाणी पूर्णपणे तुंबले आहे. सुपर रीच सोसायटीचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये लोक ट्रॅक्टरवर स्वार होऊन बाहेर पडत आहेत. मोठमोठी घरे, महागडी वाहने सर्व काही पाण्यात बुडाल्याचे व्हिडीओत दिसत आहे. त्यातच काही लोक जीवनावश्यक वस्तू ट्रॅक्टरवर ठेवून बाहेर पडत आहेत.


मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता


पुढील चार दिवस कर्नाटकच्या उत्तर आणि दक्षिण भागात आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कर्नाटकात गेल्या 42 वर्षांनंतर असा पाऊस पडला आहे. पुराचे पाणी यमलुर परिसरातील अनेक घरांमध्ये तसेच पार्किंगच्या ठिकाणी पोहोचले. आलिशान वाहन पाण्यात बुडतानाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शहरातील रेनबो ड्राईव्ह ले-आऊट, सनी ब्रूक्स ले-आऊट, सर्जापूर रोड आदी भागात पाणी साचले असून, सकाळपासूनच विद्यार्थी व कार्यालयात जाणाऱ्यांना ट्रॅक्टरमधून बाहेर काढले जात होते. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आम्ही बंगळुरूमधील पाण्याचा निचरा करण्यासाठी 1500 कोटी रुपये आणि अतिक्रमण हटवण्यासाठी 300 कोटी रुपये दिले आहेत.