Street Dog Attack: काही दिवसांपूर्वी वाघ बकरी चहाचे संचालक पराग देसाई (Parag Desai) यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी (Dog) हल्ला केला होता. अहमदाबादमधील घराबाहेरील कुत्र्याने त्यांचा चावा घेतला आणि त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कुत्र्याच्या हल्ल्यात पडल्यानंतर त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ब्रेन हॅमरेजमुळे अहमदाबाद येथील रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.


दरम्यान या भटक्या कुत्र्यांची टोळी लहान मुलांवर, येणाऱ्या जाणाऱ्यांवर आणि जेष्ठ नागरिकांवरही हल्ला करते. भटक्या कुत्र्यांनी लोकांचा बळी घेण्याची किंवा त्यातून मृत्यू ओढवण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. अलीकडच्या काळात पाळीव प्राण्यांनीही माणसांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना चर्चेत आल्या.


देशात भटक्या कुत्र्यांची संख्या किती आणि कुत्रा चावण्याच्या घटना किती?


अहवालानुसार, देशात 1 कोटीहून अधिक पाळीव कुत्रे आहेत, तर भटक्या कुत्र्यांची लोकसंख्या सुमारे 3.5 कोटी आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या डेटानुसार, 2019 मध्ये 4,146 जणांचा कुत्र्याच्या हल्लायत मृत्यू झाला. 2019 नंतर 1.5 कोटींहून अधिक जणांना कुत्रा चावल्याच्या घटना घडल्या.


उत्तर प्रदेशमध्ये कुत्र्यांच्या हल्ल्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. उत्तर प्रदेशात 2019 पासून 27.52 लाखांना कुत्रा चावला आहे. यानंतर तामिळनाडूचा नंबर लागतो, तामिळनाडूमध्ये 20.7 लाख लोकांवर कुत्र्याचे हल्ले झाले. यानंतर तिसऱ्या स्थानावर महाराष्ट्र राज्याचा नंबर लागतो. महाराष्ट्रातील 15.75 लाख लोक कुत्र्याच्या हल्ल्याचे शिकार झाले आहेत.


भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याला कोण जबाबदार?


भटके कुत्रे वेडे, भुकेले किंवा त्यांच्या पिल्लांचं संरक्षण करण्यासाठी तत्पर असू शकतात. अशा परिस्थितीत, कुत्रे पिसाळले किंवा भडकले की माणसावर हल्ला करू शकतात. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे कुत्रा चावणं, रेबीज आणि सतत भुंकणं यासारख्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. भटक्या कुत्र्यांचे हल्ले थांबवण्याकडे आणि उपाययोजना करण्याकडे सरकारचं दुर्लक्ष होताना दिसतं. 


भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्यात सरकार अपयशी ठरलं आहे. प्राणी कल्याण संस्था आणि नागरी समाज गटांचा दृष्टिकोन उदासीन आणि दुर्लक्षित राहिला आहे. भटक्या प्राण्यांची काळजी घेणाऱ्या मूठभर व्यक्तींना अनेकदा अविश्वसनीय उपहास आणि प्रतिकाराचा सामना करावा लागतो. लोक त्यांना हीन वागणूक देतात आणि नको नको ते बोलतात.


कायदा काय सांगतो?


कायद्यानुसार, रस्त्यांवरून कुत्रे हटवणं बेकायदेशीर असून कुत्र्यांना परिसरातून पळवून लावता येत नाही. त्यामुळे एकदा कुत्रा रस्त्यावर आला की त्याला कोणी दत्तक घेईपर्यंत तिथे राहण्याचा अधिकार त्याला आहे. भारतात 2001 पासून कुत्र्यांना मारण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. भारताच्या सुप्रीम कोर्टाने 2008 मध्ये मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली, ज्यात उपद्रव माजवणाऱ्या कुत्र्यांना मारण्याची परवानगी पालिकांना द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती.


भारतीय राज्यघटनेच्या कलम 51A(G) नुसार, वन्यजीवांचं संरक्षण करणं आणि सर्व सजीव प्राण्यांबद्दल सहानुभूती बाळगणं हे भारतातील प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे. भटक्या कुत्र्यांना खायला देणं हे कायदेशीर आहे. सुप्रीम कोर्टाने गेल्या वर्षी दिल्ली हायकोर्टाचा मागील आदेश कायम ठेवला होता, ज्यात रहिवाशांना त्यांच्या परिसरातील भटक्या कुत्र्यांना खायला देण्याची परवानगी दिली गेली होती.


हेही वाचा:


Education: नेमकी कशी झाली अभ्यासाला सुरुवात? पहिल्यांदा कोणत्या कारणास्तव मानवाने घेतलं शिक्षण?