नवी दिल्ली : देशासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या भारतीय सैन्यांचा (Indian Army) प्रत्येक देशावासीयांना अभिमान आहे. आपल्या कुटुंबाची पर्वा न करता भारत मातेसाठी प्राणाची आहुती देणाऱ्या या शूरवीर जवानांच्या शौर्यगाथा ऐकताना छाती अभिमानाने फुगते, पण त्यांच्या कुटुंबीयांच्या वेदना पाहून काळीज पिळवटून जाते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्याहस्ते शुक्रवारी सैन्य व अर्धसैनिक दलाच्या जवानांच्या शौर्य आणि वीरता याबद्दल त्यांना कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र देऊन सन्मानित करण्यात आले. सैन्य दलाच्या आणि अर्धसैनिक दलाच्या 10 जवानांचा कीर्ती चक्र पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्यामध्ये, 7 शहीद (Martyr) जवानांना मरणोत्तर हा सन्मान बहाल करण्यात आला आहे. या सोहळ्यातील एक भावूक क्षण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडिओमुळे अनेकांचे डोळे पाणावले आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र सन्मान स्वीकारताना कुण्या जवानाची आई डोळ्यात पाणी साठवून आली होती, तर कुणा जवानाची पत्नी पतीच्या आठवणीने भावूक झाल्याचं पाहायला मिळाली. त्यापैकी एक असलेल्या शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांना कीर्ती चक्र देऊन सन्मानित करण्यात आले. हे कीर्तीचक्र स्वीकारण्यासाठी अंशुमन यांच्या पत्नी स्मृती सिंह आणि त्यांची आई मंजू सिंह आल्या होत्या. यावेली, स्मृती सिंह यांच्या चेहऱ्यावरील भाव आणि डोळ्यातील अश्रू काळीज चिरणारे होते.
याप्रसंगी, कॅप्टन शहीद अंशुमन सिंह यांनी कशाप्रकारे आपल्या जीवाची बाजी लावून सियाचीनमध्ये सैन्य दलासाठीची औषधे, उपकरणे आणि सहकारी सैन्यातील जवानांना वाचवले, हे सांगण्यात आले. आपल्या पतीची ही शौर्यगाथा ऐकताना स्मृती सिंह यांच्या डोळ्यात अश्रू तरळल होते. पांढरी साडी परिधान केलेल्या स्मृती यांनी भरलेल्या डोळ्यांनी पतीच्या सन्मानार्थ कीर्तीचक्र स्वीकारले. यावेळी, सभागृहातही भावूक वातावरण निर्माण झाले होते. स्मृती सिंह यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून देशवासीयांकडून शहीद अंशुमन यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांस सॅल्यूट केला जात आहे. लता मंगेशकर यांनी गायलेलं गाणं.. जो शहीद हुए है उनकी, जरा याद करो कुर्बाणी... याची आठवण हा क्षण पाहताना आपसूकच होते.
दरम्यान, स्मृती यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये, ते घडलेल्या प्रसंगाची आणि त्यांनी पती अंशुमन यांच्यासमवेत पाहिलेल्या भविष्यातील स्वप्नांची माहिती देत आहेत. अगदी पहिल्या भेटीपासून ते शेवटच्या फोनकॉलपर्यंचही सगळा जीवनप्रवासच स्मृती यांनी काही मिनिटांच्या व्हिडिओतून उलगडला आहे. ''आम्ही सर्वात पहिल्यांदा कॉलेजमध्ये भेटलो, तेव्हाच मनातील प्रेम बोलून दाखवलं होतं. त्यानंतर, 1 महिन्याने ते एएफएमसीमध्ये सिलेक्ट झाले, आम्ही तब्बल 8 वर्षे रिलेशनशीपमध्ये होतो. आम्ही लग्न केले. दुर्दैवाने लग्नाच्या दोनच महिन्यानंतर त्यांची सियाचीनला पोस्टींग झाली. 18 जुलै 2023 रोजी आम्हा दोघांचं फोनवर सविस्तर बोलणं झालं. पुढील 50 वर्षे आपलं जीवन कसं असेल, मोठं घर असेल, मुलं असतील.... पण, 19 जुलै 2023 रोजी सकाळी फोन आला, ही इज नो मोर... मात्र, पुढील 7 ते 8 तास या बातमीवर माझा विश्वासच बसत नव्हता. माझं मन हे मान्य करायला तयारच नव्हते. मला ते आमच्यातून गेले आहेत, हे खरंच वाटत नव्हतं. पण, कीर्ती चक्र माझ्या हाती आल्यानंतर ते सत्य आहे, याची जाणीव मला झाली, अशी काळीज पिळवटून टाकणारी सत्यस्थिती कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या पत्नी स्मृती यांनी सांगितली.
कॅप्टन अंशुमन यांना वीरमरण
कॅप्टन अंशुमन सिंह हे पंजाब रेजिमेंटच्या 26 व्या बटालियनचे सैन्य मेडिकल कोअरच्या टीममध्ये होते. ऑपरेशन मेघदूतसाठी ते सियाचीनमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून तैनात होते. गतवर्षी 19 जुलै 2023 रोजी सियाचिन चंदन ड्रॉपिंग झोनमध्ये भीषण आगीची दुर्घटना घडली. त्यावेळी,या आगीत अडकलेल्या जवानांना बाहेर काढण्यासाठी अंशुमन यांनी जीवाची बाजी लावली. त्याचदरम्यान, मेडिकल इंवेस्टीगेशन सेंटरपर्यंत आग पोहोचली. मात्र, आपल्या जीवाची पर्वा न करत अंशुमन यांनी सेंटरमध्ये स्वत:ला झोकून दिलं. सैन्य दलासाठीच्या जीवनउपयोगी साहित्य आणि औषधांचा साठा सुरक्षीत राहावा, यासाठी त्यांनी प्राण पणाला लावले. या भीषण आगीच्या दुर्घटनेत त्यांना वीरमरण प्राप्त झालं.