पुणे : गेल्या काही वर्षांत मुलींचा जन्मदर घटल्याने शासनाकडून सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. मात्र, अद्यापही मुलांच्या तुलनेत मुलींचे सरासरी प्रमाणही घटल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे, मुलांच्या लग्नासाठी (Marraige) मुलींचे प्रमाण कमी झाल्याने समाजात मोठी तफावत निर्माण झाली आहे. लग्न हे शुभकार्य, मंगलमय सोहळा, दोन कुटुंबातील आनंदाचा क्षण असते. मात्र, गेल्या काही वर्षात मुलांच्या पालकांसाठी व मुलांसाठी लग्न ही मोठी समस्या बनली आहे. लग्नासाठी मुलीच्या कुटुंबीयाच्या अपेक्षा वाढल्या असून सरकारी नोकरदारच आपला जावई असावा अशी अपेक्षा सर्वसामान्य पालकांकडूनही व्यक्त होत आहे. त्यावरुन, सोशल मीडियातून (Social Media) अनेक रिल्स आणि मिम्सही व्हायरल होत असतात. आता, पुण्यात फ्लॅटवाला जावई पाहिजे, अशा आशयाचं एक रिल्स व्हायरल झालं असून नेटीझन्सने त्यावर कमेंट करुन भावना व्यक्त केल्या आहेत.
एकीकडे सरकारी नोकऱ्यांचा प्रमाण घटलं असून सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मोठी स्पर्धाही सुरू झाली आहे. स्पर्धा परीक्षांचं केंद्रस्थान असलेल्या पुण्यात ही स्पर्धा पाहायला मिळते. एपीएससीच्या 400 ते 500 जागांसाठी तब्बल 3 ते 4 लाख उमेदवार आपले कष्ट आणि नशिब आजमवताना दिसून येतात. त्यामुळे, सरकारी नोकरी हा नशिबाचाच खेळ बनला आहे. मात्र, आपल्या मुलीसाठी मुलगा पाहताना, मुलीच्या कुटुंबीयांकडून, पालकांकडून सरकारी नोकरदाराची अपेक्षा केली जाते. सरकारी नोकरदारांना प्राधान्याने पुण्यात नोकरी करणारा, किमान 50 हजार ते 1 लाख पगार असणारा जावई दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, त्यासाठी पुण्यात स्वत:चा फ्लॅट असावा ही अपेक्षाही मुलीच्या पालकांची असते. त्यामुळे, गावाकडून पुण्यासारख्या महानगरात येऊन नुकतेच खासगी किंवा कार्पोरेट क्षेत्रात नोकरी लागलेल्या युवकांना लग्नापूर्वी फ्लॅट घेणे शक्त होत नाही. अशावेळी, गावाकडी जमीन विकूनही काहीजण पुण्यात घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करतात. घराच्या स्वप्नावरच लग्नाचं स्वप्न अवलंबून असल्याने ही गरज पूर्ण करावी लागते, असे चित्र आहे. याच अनुषंगाने एका मुलाने हाती फ्लेक्स घेऊन मनातील खंत व्यक्त केली आहे.
रिल्स व्हायरल, लाख लाईक्स
सोशल मीडियावर एक रिल्स व्हायरल होत असून पुण्यात फ्लॅट असणारा जावई पाहिजे, अशी अपेक्षा ठेवणाऱ्या पालकांना वस्तूस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल मीडियावर अनेकदा लग्नाळू मुलांचे मिम्स आणि रिल्स व्हायरल होतात. मुलांची संख्या कमी असल्याने मुलींच्या पालकांच्या अपेक्षांवरही भाष्य केलं जातं. आता, येथील युवकाने अशाच आशयचा फ्लेक्स झळकावत मुलीच्या पालकांचे लक्ष वेधले आहे. ''स्वत:ला पुण्यात फ्लॅट घ्यायला 60 वर्ष लागली, आणि जावई मात्र 25 व्या वर्षात 2 फ्लॅटवाला पाहिजे…वाह रे दुनिया '' असा फ्लेक्स झळकावत मुलीच्या वडिलांना टोलाच लगावला आहे.
कॉमेडीवाला बसू या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन युवकाने हा फ्लेक्स झळकावून तरुणाईचे लक्ष वेधले आहे. या व्हिडिओ रिल्सला 5 दिवसांत 1 लाखापेक्षा जास्त लाईक्स मिळाले असून शेकडो युवकांनी कमेंट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामध्ये, लग्नासाठी मुली मिळवणे ही मोठी समस्या बनल्याची खंतच अनेकांनी व्यक्त केली आहे.