Mayor Marries Alligator : अलिकडच्या काळात आपला विवाह सोहळा अविस्मरणीय करण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयोग तर कधी स्टंट करताना पाहायला मिळतात. या लग्नाचं व्हिडीओही चांगलेच व्हायरल होतात. लग्न हे दोन व्यक्तींचं बंधन असं जरी म्हटलं जात असलं तरी लग्नाच्या नावाखाली अनेक विचित्र नाती बांधली जात आहेत. मध्यातंरी एका महिलेने झाडासोबत लग्न केल्याची बातमी कानावर आली होती. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. 


मेस्किकोमध्ये चक्क एका मगरीचा माणसासोबत लग्नसोहळा पार पडला आहे. हे ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. यावेळी मगरीला नव्या नवरीप्रमाणे सजवण्यात आलं होतं. मेस्किकोतील ओक्साका शहरातील (Oksaka City) सॅन पेड्रो हुआमेलुला गावामध्ये हा विचित्र आणि अनोखा लग्न सोहळा पार पडला आहे. संपूर्ण विधीनुसार हा लग्न सोहळा पार पडला आहे.


समोर आलेल्या माहितीनुसार, सॅन पेड्रो हुआमेलुला गावात महापौरांचं मगरीसोबत लग्न पार पडलं आहे. महापौर विक्टर ह्यूगो सोसा यांनी सात वर्षांच्या मगरीसोबत लग्न केलं आहे. यावेळी मगरीला नवरीप्रमाणे पांढऱ्या पोशाख घालण्यात आला होता. सर्व विधी आणि परंपरेनुसार हा लग्न सोहळा पार पडला.






मगरीसोबत लग्न करण्याची परंपरा
ओक्साकामधील चोंतल आणि हुआवे समुदायामध्ये मगरीसोबत लग्न करण्याची फार जुनी परंपरा आहे. येथील रिती-रिवाजानुसार, मगरीला राजकुमारी मानलं जातं. मगरीसोबत लग्न केल्याने देव आणि माणसांमधील संबंध चांगले राहतात, असा या समुदायाचा समज आहे. 


विशेष म्हणजे महापौरांनी मगरीसोबत लग्न केल्यानंतर तिला किससुद्धा केलं. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर फार चर्चेत आहेत. युजर्स या फोटोंवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.