Hyderabad News : पावसाने सर्वच ठिकाणी थैमान घातलेले आहे. एकीकडे लोक पाऊस पडावा म्हणून वाट पाहत होते. मात्र आता याच पावसाने घेतलेले हे रौद्र रूप पाहता सामान्य जनता घाबरून गेलेली आहे. या पावसाने अनेकांचे आता मोठे नुकसान झालेले आहे. अशातच एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. ज्या व्हिडीओमध्ये ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे संतप्त झालेल्या एका व्यक्तीने चक्क साप घेऊन कार्यालयात सोडला. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.
सरकारी अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा हा खरेतर सामान्य जनतेला काही नवीन नाही. कोणतेही काम वा अडचण त्यांच्यापर्यंत घेऊन गेले की सामान्य जनतेला नाकीनऊ येणार हे ठरलेलेच असते. याचंच हे तेलंगणातील हैदराबादमधील ताज उदाहरण. तेलंगणात गेल्या काही दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. पावासने सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. हैदराबाद शहरातील अनेक भागात पूरसदृश स्थिती आहे. लोकांच्या घरात पाणी शिरलं आहे. दरम्यान, अलवाल येथे एका व्यक्तीच्या घरात साप घुसला. या संदर्भात त्याने जीएचएमसीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र सहा तास उलटूनही कारवाई झाली नाही. यामुळे संतापलेल्या व्यक्तीने साप स्वतःहून पकडून वॉर्ड ऑफिसमध्ये नेला आणि अधिकाऱ्यांच्या टेबलावर सोडला.
हैदराबादचे भाजपचे नेते विक्रम गौर यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. त्या व्हिडीओखाली त्यांनी लिहिले आहे की,अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे तो व्यक्ती किती असहय्य झाला असेल की, त्याने चक्क अधिकाऱ्याच्या कार्यालयात साप सोडला.
तक्रार केलेल्या व्यक्तीचा आरोप आहे की, घरात साप पाहिल्यानंतर त्याने जीएचएमसीच्या अधिकाऱ्यांना अनेकदा फोन केला. मात्र तास उलटून गेल्यानंतरही अधिकाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने तो संतप्त झाला. यानंतर निषेध व्यक्त करण्यासाठी त्यानी सापाला थेट कार्यालयात सोडलं. हे पाहून अधिकारी घाबरले आणि तिथून पळू लागले.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळं तेलंगणात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. होत असलेल्या पावसामुळं सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. परिणामी शहरातील अनेक मार्गांवर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळात आहे. सततच्या वादळी पावसामुळं काही ठिकाणी झाडं कोसळली आहे. तसेच पाण्याच्या प्रवाहात दोन ते तीन वाहनं वाहून गेल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या