Parliament Monsoon Session : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी संसदेत येऊन मणिपूरच्या (Manipur) मुद्द्यावर भाषण करावं या मागणीवर विरोधक ठाम असून त्यांनी संसदेच्या (Parliament) परिसरात आंदोलन केले आहे. विरोधकांनी यावेळी काळे कपडे घालून याबाबत निषेध नोंदवला आहे. तर, मणिपूरच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी पक्षाकडूनही विरोधकांना चोख उत्तर देण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. यावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले मल्लिकार्जुन खरगे ?
मल्लिकार्जुन खरगे यांनी यावर बोलताना म्हटलं की, सत्ताधारी पक्षच आमचं तोंड बंद करण्यासाठी गोंधळ करत आहेत. यावर ते आम्हाला काही बोलूच देत नाही. याआधी सत्ताधारी पक्षाने कधीच असं केलं नव्हतं, असं म्हणत मल्लिकार्जून खरगे यांनी सत्ताधारी पक्षांवर निशाणा साधला आहे.
तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलताना मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेचा अपमान करत आहेत. त्यांना राजस्थानमध्ये जाऊन भाषण करता येतं पण, संसदेत येऊन बोलायला त्यांच्याकडे वेळ नाही का?', असा सवाल देखील मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांचं विरोधकांना चोख उत्तर
विरोधकांनी काळे कपडे घालून संसदेच्या परिसरात मणिपूरच्या मुद्द्यावर आंदोलनाचा पवित्रा घेतला. यावर सभागृहात बोलताना केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी म्हटलं आहे की, काळे कपडे घातलेल्या लोकांना देशाची वाढती ताकद अजून माहित नाही. ज्यांचे तन आणि मन दोन्ही काळे आहे त्यांच्या मनात दुसरं काय असणार? असा सवाल देखील त्यांनी विरोधकांना विचारला आहे. या लोकांचं वर्तमान, भविष्य आणि भूतकाळ काळा आहे, याचा आम्हाला अंदाज आहे. पण, यांच्या आयुष्यात देखील कधी प्रकाश येणार नाही अशी आम्हाला खात्री आहे, असं देखील मंत्री पीयुष गोयल यांनी म्हटलं आहे.
सत्ताधारी पक्ष मणिपूरमध्ये जाणार
दरम्यान, 29 आणि 30 जुलै रोजी विरोधी पक्षांचं शिष्टमंडळ मणिपूरच्या दौऱ्यावर जाणार आहे. तेथील परिस्थितीचा आढावा विरोधी पक्षांकडून घेण्यात येणार आहे. तर. या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत येऊनच उत्तर द्यावं अशी मागणी विरोधकांकडून वारंवार करण्यात येत आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावर काही तोडगा निघणार का, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.