लखनौ : कामाच्या अतिरिक्त ताणामुळे एका आठवड्यात दोन कॉर्पोरेट महिला कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. आज आणखी एक धक्कादायक घटना समोर आली असून लखनौमधील एचडीएफसी बँकेच्या आवारात खुर्चीवरून पडून एका महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. कार्यालयातील वाढता कामाचा ताण याला कारणीभूत असल्याची चर्चा आहे. 


एचडीएफसी बँकेच्या आवारात खुर्चीवरून खाली पडल्याचे बँक कर्मचाऱ्याच्या मृत्यूचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, कामाच्या जास्त दबावामुळे महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप तिचे सहकारी कर्मचारी करत आहेत.


सदफ फातिमा असं या मृत महिलेचं नाव असून त्या एचडीएफसी बँकेच्या अतिरिक्त उप-उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. या बँकेची शाखा लखनऊच्या गोमती नगर येथील विभूती खंड शाखेत आहे. त्या ठिकाणी ही घटना घडली. कार्यालयाच्या आवारात त्या खुर्चीवरून पडल्याची माहिती बँकेतील सहकारी कर्मचाऱ्यांनी दिली. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांचा जीव वाचू न शकल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आणि त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.


पुण्यातही महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू


गेल्या आठवड्यात पुण्यातील अर्न्स्ट अँड यंग येथे एका महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. अर्न्स्ट अँड यंग इंडियाचे 26 वर्षीय चार्टर्ड अकाउंटंट अॅना सेबॅस्टिन पेरायल यांचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूनंतर तिच्या आईने अॅनावर कामाचा खूप दबाव असल्याचा आरोप केला होता. तिच्या आईने सांगितले की, कामाच्या तणावामुळे ती 20 जुलै रोजी तिच्या खोलीत बेशुद्ध झाली आणि रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. अर्न्स्ट अँड यंग (EY) ची महिला कर्मचारी अॅना सेबॅस्टियनने तिच्या मृत्यूपूर्वी अनेक वेळा तिच्यावर असलेल्या कामाचा उल्लेख केला होता. 


वर्क लाईफ बॅलन्सबाबत प्रश्न 


कामाच्या तणावामुळे कर्मचाऱ्यांचा जीव जात असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे आपल्या देशातील कर्मचाऱ्यांना वर्क लाईफ बॅलन्स राखणे खरोखरच अवघड होत चालले आहे का, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहेत. 


ही बातमी वाचा :