Naaz Joshi Success and Struggle Story : नाज जोशी (Naaz Joshi) हिने इंटरनेशनल ब्युटी क्वीन 2022 चा खिताब जिंकला. आता तुम्हाला ही गोष्ट ऐकायला सामान्य वाटत असेल पण, नाजसाठी हा मोठा संघर्ष होता. नाज जोशीने भारतातील पहिली ट्रांसजेंडर ब्युटी क्वीन होण्याचा मान मिळवला. आज नाजनं समाजात आपली एक वेगळी ओळख तयार केली आहे. पण येथे पोहोचण्यापर्यंतचा तिचा संघर्ष फारच खडतर होता. हे यश संपादन करण्यासाठी तिला खूप मोठी आव्हानं आणि अडचणींना सामोरं जावं लागलं आहे. अनेक कठीण प्रसंगावर मात करत नाज जोशीने इंटरनॅशनल ब्युटी क्वीनचा मुकुट आपल्या नावे केला. 


लहान वयात आई-वडिलांनी घरातून हाकललं


नाज जोशीचा जन्म दिल्लीतील एका संपन्न कुटुंबात झाला. नाज हळूहळू मोठी झाल्यावर मुलगा असूनही तिला मुली सारखं राहायला आवडायचं. ती 8-9 वर्षांची झाल्यावर तिचं वागणंबोलणं मुलींसारखं भासू लागलं. हे सर्व पाहून शेजारीपाजारी तिच्यावर कमेंट करू लागले. हळूहळू घरच्यांना कळलं की, नाज ट्रान्सजेंडर आहे. तेव्हा तिचे घरचेही तिचा तिरस्कार करू लागले आणि मग वयाच्या दहाव्या वर्षी नाजला आई-वडीलांनी घरातून हाकलून दिलं. घरातून बाहेर काढल्यावर नाज मुंबईत राहणाऱ्या तिच्या मामाकडे गेली.


मुंबईत ओळखीच्या लोकांकडून सामूहिक बलात्कार 


वयाच्या 10 व्या वर्षी नाज दिल्लीहून मुंबईत आली, पण संकटांनी तिची साथ सोडली नाही. नाजला तिच्या मामाने ढाब्यावर नोकरी मिळवून दिली. एके दिवशी ती ढाब्यावर काम करून घरी परतली, तेव्हा तिच्या मामाचा मुलगा त्याच्या मित्रांसोबत दारू पित बसला होता. त्यांनी नाजला दारू देऊ केली, पण तिने नकार दिला. यानंतर त्यांनी नाजला कोल्ड्रिंकमधून दारू दिली. ते प्यायल्यावर ती बेशुद्ध झाली. यानंतर मामाचा मुलगा आणि त्याच्या मित्रांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. गँगरेपची माहिती मिळताच नाजचा मामा तिला उपचाराच्या बहाण्याने रुग्णालयात घेऊन गेला आणि तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर मामा परत आलाच नाही.


कधी मागितली भीक, तर कधी सेक्स वर्करचं काम


दवाखान्यात दाखल झाली तेव्हा, नाजचे ना घर होते, ना स्वतःचे कोणी. यावेळी एका तृतीयपंथीयाची नजर नाजवर पडली. ती नाजला घेऊन तिच्या गुरूकडे गेली. त्या गुरूने नाजला भिक मागायला लावले. यानंतर तिला बारमध्ये डान्स करायला लावले. इतकंच नाही तर त्या काळात नाजला बळजबरीने अनेकवेळा सेक्स वर्कर म्हणूनही काम करावं लागलं. या सर्व आव्हानांना न जुमानता नाझने अभ्यास सुरूच ठेवला. तिने ड्राईंग एग्झाम इंटरमिजिएटही दिली होती. जेव्हा नाज 18 वर्षांची झाली तेव्हा ती या आयुष्यातील संकटामुळे अतिशय अस्वस्थ झाली आणि काही दिवस डिप्रेशनमध्येही गेली होती.


चुलत बहिणीने साथ दिली आणि आयुष्य बदलले


नैराश्याच्या काळात नाजला त्याच्या चुलत बहिणीची आठवण झाली. तिने बहिणीशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधला. इथेच नाजच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. चुलत बहिणीने नाजला मदत केली आणि तिला त्या नरकातून बाहेर काढले. यानंतर बहिणीने नाजला दिल्लीला बोलावले आणि तिला फॅशन डिझायनिंग कोर्ससाठी दिल्लीतील NIFT मध्ये प्रवेश मिळवून दिला. नाज जोशीने खूप मेहनतीने अभ्यास केला आणि टॉपर झाली. तिची कॅम्पस प्लेसमेंटही मिळाली. नाजने काही दिवस काम करून पैसे वाचवले. त्यानंतर त्या पैशातून लिंग बदलाची शस्त्रक्रिया केली आणि ती मुलगी झाली.


... आणि नाजचं आयुष्य बदललं


जेव्हा नाज पूर्ण मुलगी झाली तेव्हा एका प्रसिद्ध फोटोग्राफरची नजर तिच्यावर पडली. त्याने नाजला मॉडेलिंगची ऑफर दिली. ही ऑफर स्वीकारून नाझने फॅशन शो आणि ब्युटी इंडस्ट्रीच्या जगात पाऊल ठेवलं. तिनं सलग 3 वर्षे मिस वर्ल्ड डायव्हर्सिटीचा किताब पटकावला. गेल्या वर्षी नाजने ट्रान्सजेंडर इंटरनॅशनल ब्युटी क्वीनचा किताब जिंकून जगभर प्रसिद्धी मिळवली. नाज जोशीने आतापर्यंत 8 सौंदर्य स्पर्धा जिंकल्या आहेत. यापैकी 7 आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Marriage : 'येथे' लग्नाआधीच द्यावा लागतो मुलांना जन्म; भारतातील काही विचित्र प्रथांबद्दल वाचा सविस्तर