Trending MP Handpump Video : तुम्ही आतापर्यंत पाण्याच्या बोअरवेल (Borewell) पाहिल्या असतील. पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं की, बोअरवेलमधून पाण्याऐवजी दारू निघत असेल तर... हो मध्य प्रदेशमध्ये असे काही बोअरवेल सापडले आहेत, ज्यामधून पाण्याऐवजी दारू (Alcohol) निघते. या बातमीमुळे परिसरात चांगलीच खळबळ माजली. मात्र हा कोणताही चमत्कार किंवा खाण नसून दारुच्या अवैध साठा उघडकीस आला आहे. मध्य प्रदेशामध्ये पोलिसांनी दारुच्या अवैध साठ्यावर कारवाई केली आहे.  


मध्य प्रदेशमध्ये पोलिसांनी अवैध दारुचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापेमारी केली आणि अवैध दारूच्या धंदाच्या पर्दाफाश केला. या आरोपींनी चक्क जमिनीखाली दारुचा साठा करुन ठेवला होता. पोलिसांना तपासाअंती जमिनीखाली आठ बॅरल दारूचा अवैध साठा आढळून आला.


मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात पोलिसांनी बुधवारी (12 ऑक्टोबर)  ही छापेमारी केली आहे. तपास करताना पोलिसांना बोअरवल आढळून आले. यापैकी एका बोअरवेलमधील पाण्याऐवजी दारु येत होतं. अवैध दारुचा साठी करण्यासाठी हा देसी जुगाड पाहून पोलीसही चांगलेच चक्रावले. बोअरवेलमधून दारू निघतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 




पोलिसांना छापेमारीमध्ये आठ बॅरल दारुचा अवैध साठा आढळून आला आहे. आरोपींनी घरापासून काही दूर अंतरावर जमिनीखाली दारु भरलेले ड्रम लपवले होते. या ड्रमचं कनेक्शन बोअरवेलला देण्यात आलं होतं. त्यामुळे या बोअरवेलमधून पाण्याऐवजी दारू येत होती. पोलीस घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत आरोपी फरार झाले होते. आरोपी बोअरवेलमधून दारू पॉलिथीन बॅगमध्ये भरून त्याची अवैध प्रकारे विक्री करत होते.


पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गुना येथील पोलीस अधिक्षक पंकज श्रीवास्तव यांनी माहिती दिली आहे की, पोलिसांनी बोअरवेल आणि अवैध दारुचा साठा जप्त केला आहे. आरोपींचा शोध सुरु आहे. आठ आरोपींची ओळख पटली असून त्यांचा शोध सुरु आहे. पोलिसांना तपास करताना बोअरवेलमधूल दारु येत असल्याचं समजलं. या परिसरात अनेक ठिकाणी देशी दारु बनवली जाते. पोलिसांनी याआधीही अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे.