मुंबई : भटक्या कुत्र्याला अमानुष मारहाण करत त्याची हत्या केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना मुंबईतून समोर आली आहे. मुंबईच्या अंधेरीमध्ये कुत्र्याला अमानुष मारहाण करत हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. महत्त्वाचं म्हणजे या आरोपीला फक्त 50 रुपयांमध्ये जामीन मिळाला. एका निष्पाप मुक्या प्राण्याच्या जिवाची किंमत फक्त 50 रुपये असा सवाल आता उपस्थित होत आहे.


कुत्र्याला अमानुष मारहाण करत हत्या


अंधेरीतील लोखंडवाला येथील रुनवाल एलिगंट येथील जयेश देसाई नावाच्या व्यक्तीने सोसायटीच्या आवारातील कुत्र्याला बेदम मारहाण केली. यामध्ये कुत्र्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला. यानंतर प्राणी मित्रांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार केली.


आरोपीला फक्त 50 रुपयांमध्ये जामीन


पोलिसांकडून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात, पण केवळ 50 रुपयांच्या जामिनावर त्याची सुटका झाली. यानंतर आता नेटकऱ्यांकडून या घटनेवर संताप व्यक्त करत निष्पाप 'जय' या कुत्र्यासाठी न्याय मागण्यात येत आहे. यासाठी सोशल मीडियावर पोस्टही करण्यात येत आहेत.






पोस्टमध्ये काय म्हटलंय?


कृपया, आरोपीला शिक्षा मिळवून देण्यासाठी मदत करा, जयेश देसाईने कुत्र्याला क्रूरपणे मारलं, एफआयआर दाखल झाला, पण आपले कायदे कमकुवत असल्याने त्याला सहज जामीन मिळाला. जय नावाच्या निष्पाप कुत्र्यावर झालेला क्रूर हल्ला आणि हत्येच्या भयंकर घटनेबद्दल सांगताना आम्हाला अतिशय दुःख होत आहे. लोखंडवाला येथील रुनवाल एलिगंट येथे राहणाऱ्या जयेश देसाई नावाच्या व्यक्तीने हे भयंकर कृत्य केलं आहे. जयेश देसाईने केलेल्या क्रूर हल्ल्यात जयची कवटी तुटली आणि जखमांच्या तीव्रतेमुळे त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.


क्रूरतेच्या या कृत्याने आम्हाला धक्का बसला आहे. शिवानी शर्मा ज्यांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून तत्परतेने कारवाई केली, त्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, 1960 च्या कलम 429 आणि 11 (अ) अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दु:खद घटनेमुळे प्राणी संरक्षणासाठी आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी कायदे कठोर करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


निष्पाज जयला न्याय देण्याची मागणी करत आहोत. गुन्हेगारवर कायदेशीर कारवाई व्हावी, यासाठी आम्ही अधिकाऱ्यांना आवाहन करतो. मूक प्राण्यावरील अशाप्रकारच्या हिंसाचाराच्या विरोधात आपण आवाज उठवणे आणि आपल्या समाजातील मुक्या आणि निराधार प्राण्यांसाठी उभं राहणं अत्यावश्यक आहे.