Travel: आपल्या देशात हॉटेल म्हटले तर समोर चित्र येते ते म्हणजे खाण्यचे ठिकाण... परंतु हॉटेल म्हणजे फक्त  खाण्याचे ठिकाण नसते त्यामध्ये देखील विविध प्रकार असतात. तुम्ही हॉटेल्स, मॉटेल, रेस्टॉरंट आणि रिसॉर्ट ही नाव ऐकली असतील. परंतु अनेकजणांचा हॉटेल, रेस्टॉरंट या नावांमध्ये गोंधळ होतो.  त्यामुळे ते प्रत्येक ठिकाणाला हॉटेल म्हणतात. आज आपण  यामध्ये नेमका फरक काय हे जाणून घेणार आहे. 


हॉटेल (Hotel)


हॉटेल म्हणजे राहण्याचे ठिकाण....  पर्यटनस्थळे, विमानतळ, रेल्वेस्थानक, शहराच्या मध्यवर्ती भागात हॉटेल असतात. हॉटेलमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी खोल्या असतात. तसेच वाहनांसाठी प्रशस्त पार्किंगची सोय देखील असते. हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला गेस्ट असे म्हटले जाते.   हॉटेलमध्ये किचन देखील असते.  जिथे गेस्टसाठी जेवण बनवले जाते. हॉटेलच्या खोल्यांमध्ये मिनी बार, जेवण, टीव्हि, फ्रिज, टेलिफोन आणि रुम सर्व्हिस यासारख्या सुविधा असतात. भारतात ताज, ओबेरॉय,रॅडिसन, ली मेरिडिअन ही सुप्रसिद्ध हॉटेल आहेत. सुविधा आणि बजेटनुसार हॉटेलची टू स्टार, थ्री स्टार, फोर स्टार, फाईव्ह स्टार आणि सेव्हन स्टार अशी विभागणी केली जाते.


मॉटेल (Motel) 


मॉटेल (Motel) हा शब्द मोटर (Motar) आणि हॉटेल (Hotel) या दोन शब्दांनी जोडून बनवण्यात आला आहे. मॉटेल हे बहुधा हायवेवर पाहायला मिळतात. लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विश्रांतीची सोय मॉटेलमध्ये केली जाते. मॉटेलमध्ये प्रवाशांच्या आरामासाठी खोल्या असतात. या खोल्या जास्त मोठ्या नसतात. मॉटेलमध्ये पार्किंगची सोय असते. मॉटेलमध्ये किचन नसते. मात्र काही मॉटेलमध्ये प्रवाशांसाठी जेवणाची सोय केली जाते. मॉटेल हे प्रवाशांच्या आरामासाठी बनले जातात. त्यामुळे हे जास्त महाग नसतात. मॉटेल हे विदेशात असतात. लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा विचार करून मॉटेल बनवण्यात आले आहे.


रेस्टॉरंट (Restaurant) 


रेस्टॉरंट ही खाण्याची जागा असते. परंतु आपल्याकडे सर्रास  या जागेला हॉटेल म्हटले जाते. रेस्टॉरंटमध्ये फ्कत खाण्याची सोय केलेली असते. शहराच्या मध्यवर्ती भागात, हायवेवर रेस्टॉरंटची सोय असते. रेस्टॉरंटमध्ये जेवण मिळते. घाईत असाल तर पार्सलची देखील सुविधा असते. रेस्टॉरंटमध्ये राहण्याची सोय नसते


रिसॉर्ट (Resort) 


रिसॉर्ट हे प्रशस्त, महागडे असतात. रिसॉर्ट हे टुरिस्ट लोकेशनवर असतात. रिसॉर्ट बनवण्याकरता प्रशस्त जागेची गरज असते. बहुतांश रिसॉर्ट हे निसर्गरम्य ठिकाणी असतात.  नेहमीच्या दगदगीच्या जीवनातून थोडी विश्रांती मिळावी य हेतून रिसॉर्टची निर्मिती करण्यात येते. रिसॉर्टमध्ये मनोरंजनाच्या सुविधा, स्विमिंग पूल, जिम, स्पासारख्या लग्झरी सुविधा असतात. रिसॉर्टला विकएंडला जाण्याचा सध्या कल आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :


Guarantee And Warranty : गॅरंटी आणि वॉरंटीमध्ये नेमका फरक काय? अनेकजण सहसा 'या' गोष्टींबद्दल गोंधळतात