Dancing Dadi: 'एज इज जस्ट अ नंबर' असं म्हटलं जात. कला, छंद जोपासायला वयाची अट नसते. वयाचा विचार न करता अनेक लोक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत. हे लोक तरुण पिढीला प्रेरणा देत असतात. सध्या सोशल मीडियावरील (Social Media) एक आजी कित्येकांना आपल्या डान्सिंग स्किल्सनं आश्चर्यचकित करत आहेत. या डान्सिंग दादी (Dancing Dadi) कोण आहेत? त्या सोशल मीडियावर का फेमस झाल्या? असे प्रश्न तुम्हाला पडत असतील. जाणून घेऊयात 63 वर्षाच्या या डान्सिंग दादींबद्दल...
63 वर्षाच्या रवी बाला शर्मा या सोशल मीडियावर डान्सिंग दादी नावानं फेमस आहेत. रवी बाला शर्मा यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरील बायोमध्ये लिहिलं आहे, 'डान्सिंग दादी, मी 64 वर्षाची आहे आणि मी अजूनही बर्थ विशेस मागते.' रवी बाला शर्मा या पंजाबी, बॉलिवूड आणि मराठी गाण्यांबरोबरच इतर हिट गाण्यांवरील डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. या व्हिडीओमधील त्यांच्या डान्सचं नेटकरी कौतुक करतात.
डान्सिंग दादीनं हिट गाण्यांवर केला डान्स
रवी बाला शर्मा यांनी पंजाब केसरी क्लबच्या स्पर्धेत भाग घेतला असून कलर्सवर प्रसारित होणाऱ्या 'डान्स दिवाने' या रिअॅलिटी शोमध्ये देखील त्यांनी सहभाग घेतला. त्यांनी अतरंगी रे चित्रपटातील चका चक गाण्यावर केलेल्या डान्सचा व्हिडीओ तसेच चंद्रमुखी या मराठी चित्रपटातील चंद्रा या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 'बिजली बिजली', 'लवर', 'जुगनू', 'ऐरा गैरा' या गाण्यांवरील डान्सचा व्हिडीओ देखील रवी बाला शर्मा यांनी शेअर केला.
सेलिब्रिटींनी केले कौतुक
रवी बाला शर्मा यांच्या चंद्रा या गाण्यावरील लावणीच्या व्हिडीओला कमेंट करुन अभिनेत्री अमृता खानविलकरनं या डान्सिंग दादींचे कौतुक केले होते. तसेच गायक दिलजीत दोसांझ आणि फिल्ममेकर इम्तियाज यांनी देखील त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन रवी बाला शर्मा यांचा व्हिडीओ शेअर करुन त्यांचे कौतुक केलं.
नृत्य करणाऱ्या या आजींने संगीताचे धडेही घेतले आहेत. रवी बाला शर्मा यांनी संगीत शिक्षक आणि तबला वादक असलेल्या त्यांच्या वडिलांकडून गायन आणि तबल्याचे प्रशिक्षण घेतले आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: