मुंबई : आईस्क्रीममध्ये माणसाचं बोटं, गोम आणि जेवणात ब्लेडनंतर सापडल्यानंतर आता वंदे भारत ट्रेनच्या जेवणात झुरळ सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मागवलेल्या जेवणात प्रवाशाला मेलेलं झुरळ आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. भारत प्रवाशाने एक्स मिडिया पोस्टद्वारे ही धक्कादायक बाब शेअर केली असून आयआरटीसीवर संताप व्यक्त करत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या बातमीमुळे वंदे भारत एक्सप्रेसमधील जेवणाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित करण्यात येत असून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
वंदे भारत एक्सप्रेसच्या जेवणात सापडलं झुरळ
एका एक्स युजरने वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या जेवणात मृत झुरळ सापडल्याचा फोटो शेअर केला आहे. 18 जून रोजी भोपाळहून आग्रा मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जेवणात झुरळ सापडल्याचं या युजरने सांगितलं आहे. युजरने संबंधित कँटीनवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने (IRCTC) या घटनेची दखल घेतली आहे. आयआरसीटीसीने (IRCTC) त्यांच्या पोस्टला प्रतिसाद देत झालेल्या गैरसोयीबद्दल माफी मागितली आहे.
प्रवाशाने सोशल मीडियावर शेअर केला फोटो
देशातील प्रिमियम ट्रेनपैकी एक असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या जेवणात झुरळ सापडल्याची घटना समोर आली आहे. एक्स मीडिया युजक विदित वार्ष्णेने मेलेल्या झुरळांसह जेवणाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसह त्याने लिहिलं आहे की, 'आज 18-06-24 रोजी माझे काका आणि काकू वंदे भारत एक्सप्रेसने भोपाळहून आग्राला जात होते. त्यांना आयआरसीटीसीकडून घेतलेल्या अन्नामध्ये झुरळ आढळलं. कृपया विक्रेत्यावर कठोर कारवाई करा आणि असे पुन्हा होणार नाही याची काळजी घ्या.'
फोटो शेअर करत प्रवाशाची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार
घटनेची दखल घेत IRCTC ने मागितली माफी
भोपाळच्या राणी कमलापती स्टेशन ते हजरत निजामुद्दीन दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मंगळवारी ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. त्याबाबत संबंधित प्रवाशाच्या नातेवाईकाने सोशल मीडियावर फोटो आणि पोस्ट शेअर करत आयआरसीटीसीसह रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार केली होती. तक्रारीनंतर दोन दिवसांनी, आयआरसीटीसीने आता फूड सर्व्हिंग फर्मवर दंड ठोठावत प्रवाशांची माफी मागितली आहे आणि यापुढे अशी घटना घडणार नाही अशी काळजी घेण्यात येईल, असं म्हटलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :