मुंबई : जगात अद्यापही अनेक रहस्य दडलेली आहेत, ज्याबाबत अजून कुणालाही माहिती नाही, असं म्हटलं जातं. ब्रम्हांडातही पृथ्वीप्रमाणे इतर ग्रह आहेत, जिथे जीवसृष्टी आहे असंही मानलं जातं. दुसऱ्या ग्रहांवरील सजीवांना एलियन (Alien) म्हटलं जातं. एलियन पृथ्वीवर आल्याचे दावेही अनेक वेळा करण्यात आले आहेत. अलिकडेच पेरूमध्ये एलियनने हल्ला केल्याचे दावेही करण्यात आले होते. दरम्यान, असे दावे अनेकदा करण्यात आले असले, तरी त्याच्या अस्तित्वाचे पुरावे मात्र, आतापर्यंत सापडले नव्हते. पण, आता एलियनच्या अस्तित्वाबाबत  पेंटागॉनच्या व्हिडीओवरुन खळबळ माजली आहे. 


अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयानं काय म्हटलं?


पेंटागॉनच्या व्हिडीओमध्ये एक रहस्यमयी वस्तू उडताना दिसत आहे. ही वस्तू युएफओ असल्याचा दावा करण्यात आला आहे. जुलै 2023 मध्ये अमेरिकेच्या एका संसदीय सदस्यांना तीन व्हिडीओ दाखवण्यात आले होते. अमेरिकेच्या नौदलाच्या लढाऊ विमानांच्या कॅमेऱ्यात चित्रित झालेल्या व्हिडीओमध्ये युएफओ सदृष्य वस्तू दिसल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये एक गोल रहस्यमय वस्तू आकाशात वेगाने उडत असल्याचं दिसून येत आहे. 


दरम्यान, पेंटागॉन म्हणजेच अमेरिकेच्या संरक्षण विभागाने 31 ऑगस्ट रोजी UFO Clearinghouse नावाची वेबसाईट सुरु केली आहे. या वेबसाईटवर युएफसोसंबंधित माहिती अपलोड केली जाईल. युएफओ संदर्भातील दाव्यावर संशोधन करुन त्यासंदर्भातील माहिती येथे उपलब्ध केली जाईल. दरम्यान, ही रहस्यमयी वस्तू यूएफओ असल्याचा दावा केला जात आहे. पण, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.




वैज्ञानिकाचं म्हणणं काय?


बीबीसीच्या बातमीनुसार, अमेरिकेच्या पेन विद्यापीठातील इतिहास आणि जैव-नीतीशास्त्राचे प्राध्यापक ग्रेग अगिगियन यांच्या मते, आकाशात रहस्यमय गोष्टी दिसल्याचा दावा मानवाकडून अनेक शतकांपासून करण्यात आले आहेत. या रहस्यमयी गोष्टींना UFO म्हणतात. 


UFO म्हणजे काय?


UFO अर्थात Unidentified Flying Object म्हणजे अज्ञात उडणारी वस्तू. याचाच अर्थ असा की, हवेत उडणारी अज्ञात वस्तू ज्याची कोणतीही ओळख नाही. याला उडत्या तबकड्या असंही म्हणतात. याबाबत अधिक माहिती उपलब्ध नाही. अनेक वेळा UFO दिसल्याचे दावे करण्यात येतात. त्यामुळे शास्त्रज्ञांकडून याबाबत अधिक संशोधन सुरु आहे. अनेक लोकांच्या दाव्यानुसार, UFO एलियनच्या जगातून येतात. UFO म्हणजे उडत्या तबकड्या हे एलियन्सच्या प्रवासाचं साधन असल्याचा दावा करण्यात येतो.


पहिल्यांदा UFO केव्हा दिसला?


उडत्या तबकड्या म्हणजेच UFO पहिल्यांदा 1947 मध्ये दिसल्याचं सांगितलं जातं. अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍याजवळ त्याच्या उड्डाणाच्या वेळी केनेथ अरनॉल्ड या खाजगी पायलटने रहस्यमयी वस्तू उडताना पाहिली होती. ही बातमी तेव्हा जगभर पसरली होती. एका पत्रकाराने याची बातमी प्रसारीत करत त्या रहस्यमयी वस्तूला फ्लाइंग सॉसर असं नाव ठेवलं होतं. नंतर यालाच UFO म्हटलं जाऊ लागलं. 1947 नंतरही अनेक वेळा युएफओ दिसल्याचे दावे करण्यात आले आहेत.