121 Year Old Cadbury Chocolate : कॅडबरी (Cadbury) चॉकलेटला जगभरातील अनेकांची पसंती आहे. कॅडबरी कंपनी फार जुनी आहे. आता 100 वर्षाहूनही जास्त काळ जुन्या कॅडबरी चॉकलेटचा लिलाव होणार आहे. हे चॉकलेट 1902 मध्ये तयार करण्यात आलं होतं. आता 121 वर्षा जुन्या या कॅडबरी चॉकलेटचा लिलाव करण्यात येणार आहे. हे चॉकलेट एका खास कारणानिमित्त बनवण्यात आलं होतं.
121 वर्ष जुनं कॅडबरी चॉकलेट
121 वर्ष जुनं हे कॅडबरी चॉकलेट किंग एडवर्ड (King Edward VII) आणि राणी अलेक्झांड्रा (Queen Alexandra) यांच्या राज्याभिषेकाच्या स्मरणार्थ 1902 मध्ये तयार करण्यात आलं होतं. आता तब्बल 100 वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतर या खास कॅडबरी चॉकलेटचा लिलाव करण्यात येणार आहे. कॅडबरी ही एवढी जुनी कंपनी आहे, हे अनेकांना माहीतही नसेल. 1902 मध्ये जेव्हा एका 9 वर्षांच्या मुलीला शाळेत हे देण्यात आले तेव्हा तिने खाण्याऐवजी जपून ठेवलं होतं. आता याचा लिलाव होणार आहे.
खास प्रसंगासाठी बनवलेलं कॅडबरी चॉकलेट
इंग्लंडचे किंग एडवर्ड आणि राणी अलेक्झांड्रा यांच्या राज्याभिषेकाच्या खास प्रसंगासाठी हे खास कॅडबरी चॉकलेट बनवण्यात आलं होतं. त्याकाळात अनेक लहान मुलांसाठी चॉकलेट खाणं म्हणजे एक स्वप्न होतं, कारण ते परवडणारं नव्हते. त्यावेळी मुलांना इतकं महागडे चॉकलेट मिळणं इतके सोपे नव्हतं. 1902 मध्ये किंग एडवर्ड आणि राणी अलेक्झांड्रा यांच्या राज्याभिषेकानिमित्त तेथील शाळेतील लहान मुलांना हे खास चॉकलेट वाटण्यात आलं होतं. शाळेत शिकणाऱ्या नऊ वर्षांच्या मेरी अॅन ब्लॅकमोरला हे चॉकलेट मिळालं, तेव्हा तिने ते खाण्याऐवजी जपून ठेवलं.
अनेक दशकांचा ठेवा
मेरीला मिळालेलं हे खास कॅडबरी व्हॅनिला चॉकलेट तिने जपून ठेवलं. मेरीनंतर अनेक दशकांपासून त्यांच्या कुटुंबाने ही आठवण जपून ठेवली आहे. पण, आता मेरीच्या नातीने या खास कॅडबरी चॉकलेटचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. मेरीची नात जीन थॉम्पसन आता 72 वर्षांची आहे. जीन यांनी 121 वर्ष जुन्या या खास कॅडबरी चॉकलेटचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.
फारच खास आहे चॉकलेट
या दशकांपूर्वीच्या कॅडबरी चॉकलेटच्या अस्तित्वाची कुणालाही जाणीव नव्हती. जेव्हा जीन या चॉकलेटचा टिन बॉक्स घेऊन हॅन्सनच्या लिलावकर्त्यांकडे पोहोचल्या तेव्हा याबाबतची माहिती आणि इतिहास समोर आला. या खास कॅडबरी चॉकलेटच्या टिन बॉक्सवर किंग एडवर्ड आणि राणी अलेक्झांड्रा यांचा फोटो आणि 1902 सालाचा उल्लेख आहे.
हॅन्सन्स ऑक्शनियर्सचे मॉर्व्हन फेर्ली यांनी सांगितलं की, "त्या काळात, ही एक मोठी भेट होती, कारण मुलांना कधीच चॉकलेट मिळत नव्हतं. या चिमुरडीसाठी ही नक्कीच इतकी खास भेट होती की, तिला वाटले की, ती त्याला स्पर्शही करू शकत नाही."
चॉकलेटला लिलावात किती किंमत मिळणार?
या चॉकलेटला चांगली किंमत मिळण्याची अपेक्षा आहे. या चॉकलेटसाठी किमान 100 से 150 पाउंड म्हणजेच सुमारे 16 हजार रुपये किंवा त्याहूनही अधिक रक्कम मिळू शकतात. दरम्यान, ही किंमत खरेदी करणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असेल. काही लोकांना अशा गोष्टी किंवा वस्तूंचा संग्रह करण्याची आवड असते आणि त्यासाठी ते मोठी किंमतही मोजायला तयार असतात.
चॉकलेट खाण्यायोग्य आहे?
दरम्यान, हे 121 वर्ष जुनं चॉकलेट आता खाण्यायोग्य नाही. या कॅडबरी चॉकलेटची मुदत संपली असून ते आता खाण्यायोग्य नसेल. हे चॉकलेट एक टिन डब्ब्यामध्ये असून हा डबा उघडल्यावर व्हॅनिला चॉकलेटचा फार छान सुगंध येतो.