Emoji History Dignificance : आज 'वर्ल्ड इमोजी डे' (World Emoji Day 2022) आहे. सध्याच्या आधुनिक युगात सोशल मीडियाद्वारे आपण एकमेकांशी जोडले जातो. सोशल मीडिया एकमेकांसोबत संवाद साधताना आपण इमोजीचा वापर करतो. आपण चॅट, पोस्ट किंवा कमेंट करताना सर्रास इमोजीचा वापर करतो. त्यामुळे इमोजी आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. इमोजीमुळे आपण आपल्या मनातील भावना किंवा चेहऱ्यावरील हावभाव समोरच्यापर्यंत उत्तमरित्या पोहोचवू शकतो. दरम्यान, आज 17 जुलै रोजी जगभरात 'वर्ल्ड इमोजी डे' (World Emoji Day 2022) साजरा केला जातो. इमोजीचा शोध कुणी आणि कसा लावला, इमोजी डे चा इतिहास काय याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.


इमोजीचा शोध कधी, कुठे आणि कुणी लावला?


इमोजीचा शोध जपानमध्ये लागल्याचं सांगितलं जातं. शिगेताका कुरिता (Shigetaka Kurita) यांनी 1998 इमोजीचा शोध लावला. जगातील पहिला इमोजी त्यांनी एका टेलिकॉम कंपनीसाठी तयार केला होता. 90 च्या दशकाच्या शेवटी इमोजीचा शोध लागला. शिगेताका कुरिता एका एनटीटी डोकोमो (NTT Docomo) या टेलिकॉम कंपनीसाठी काम करत होते. मेसेजमध्ये आपली भावना अधिक चांगल्याप्रकारे मांडण्यासाठी त्यांनी फोटो ऐवजी कॅरेक्टर वापरण्याची संकल्पना मांडली, यातूनच इमोजीचा जन्म झाला.


इमोजीचा इतिहास


पूर्वी ईमेल पाठवण्यासाठी अक्षरांची संख्या फक्त 250 होती. लोकांना त्यांच्या भावना इतक्या कमी शब्दांत समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवता येत नव्हत्या. ही अडचण दूर करण्यासाठी कुरिता यांनी पहिल्यांदा इमोजी बनवण्यास सुरुवात केली. 1998 च्या शेवटी आणि 1999 च्या सुरुवातीला इमोजीचा वापर सुरु झाला. त्यानंतर हळूहळू 2010 नंतर इमोजीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. 1999 मध्ये  शिगेताका कुरिता यांनी इमोजीचा पहिला सेट जारी केल्या. या इमोजी सेटमध्ये स्माईली, राग अशा वेगवेगळ्या भावनांचे इमोजी होते.


'इमोजी डे' का साजरा केला जातो?


इमोजीपीडिया या वेबसाईटने ही संकल्पना सुरु केली. आपल्या आयुष्यामधील इमोजीचं महत्त्व पटवून देण्यासाठी इमोजीपीडिया ऑनलाइन वेबसाइटच्या संस्थापकांनी पहिल्यांदा इमोजी डे साजरा केला. 


2014 पासून 'इमोजी डे' साजरा करण्यास सुरुवात


2014 पासून 'इमोजी डे' साजरा केला जातो. इमोजीपीडिया ही एक युनिकोड मानक ऑनलाइन वेबसाइट आहे. ही वेबसाईट इमोजी आणि त्यांच्या डिझाइनची नोंदणी करते. इमोजीपीडियाचे (Emojipedia) संस्थापक जेरेमी बर्गे (Jeremy Burge) यांनी 2014 मध्ये पहिल्यांदा 'इमोजी डे' साजरा करण्यास सुरुवात केली होती. 2010 मध्ये इमोजींचा वापर वाढला आणि 'वर्ल्ड इमोजी डे' जगभरात साजरा होण्यास सुरुवात झाली.