नागपूरः मतदार यादीमध्ये नोंदणीसाठीचा शासकीय वेळापत्रक जाहीर होताच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागतात. स्थानिक बीएलओ संदर्भात माहिती सार्वजनिक नसते, आणि बीएलओची उदासिनता बघता नागरिकांकडूनही विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांना मतदार नोंदणीसाठी आपले सर्व कागदपत्र देतात. मात्र अनेकवेळा कागदपत्र देऊनही नोंदणी झाली नसल्याने यंदाही हजारो मतदार मतदानापासून वंचित राहणार असल्याची स्थिती आहे.
मानेवाडा परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने मतदार नोंदणी कार्यक्रम सुरु असताना स्थानिक बीएलओ यांच्यापर्यंत मतदार नोंदणीसाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र व्यस्त असलेल्या बीएलओची भेट काही झाली नाही. त्यानंतर परिसरातील स्थानिक नेत्याच्या जनसंपर्क कार्यालयात मतदार नोंदणीसाठी बोर्ड लागलेला असताना तिने जनसंपर्क कार्यालयातील कर्मचाऱ्याकडे अर्ज भरुन सर्व आवश्यक कागदपत्रेही दिली. त्यानंतरच्या निवडणूकीतही तिचे मतदार ओळखपत्र आले नसल्याने ती मतदान करु शकली नाही. नुकत्याच आटोपलेल्या मतदार नोंदणी कार्याक्रमात तिने परत त्याच जनसंपर्क कार्यालयात कागदपत्रे दिली. मात्र आता मनपाच्या आगामी निवडणूकतही तिचे ओळखपत्र आलेले नाही. तसेच ऑनलाईनही तिची नोंदणी झाले नसल्याचे दिसून आले यामुळे ती पुन्हा मतदानाला हुकणार आहे.
असाच अनुभव झांशीराणी चौकात राहणाऱ्या तरुणालाही आला. त्याने ऑनलाईन मतदार नोंदणी केली होती. त्याच्याकडे एसएमएसद्वारे अॅप्लिकेशन क्रमांकही आला होता. मात्र दोन वर्ष उलटूनही त्याच्याकडे अद्याप मतदान ओळखपत्र प्राप्त झालेले नाही आणि ऑनलाइन शोधल्यावरही त्याचा मतदार ओळखपत्र बनला नसल्याचे आढळून आले.
पत्ता बदलला, दुरुस्ती केली तरी...
फ्रेण्ड्स कॉलोनी येथील नव्याने घर घेतलेले कुटुंब मुळचे गोंदिया येथील रहिवासी. नोकरीनिमित्त ते नागपूरात स्थाई झाले. मात्र राजकीय पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात आतापर्यंत अनेक चकरा मारुनही त्यांचे नागपूरचे मतदार ओळखपत्र बनलेले नाही. त्यामुळे यांचा संपूर्ण कुटुंबही मनपाच्या आगामी मतदानाला मुकणार आहे.
'त्याचे' शेकडो अर्ज स्विकारतातच कसे?
मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर होताच, राजकीय पक्षांकडून आपल्या जनसंपर्क कार्यालयात मोठे बॅनर आणि होर्डिंग लावण्यात येतात. नागरिकांकडून कागदपत्रेही गोळा केली जातात. मात्र अनेकवेळा नागरिक उशीरा अर्ज भरत असल्याने त्यांचे अर्ज कार्यालयातच पडून राहतात आणि गहाळ होत असल्याचे एका जनसंपर्क कार्यालयातील कर्मचाऱ्याने खासगीत सांगितले. मतदार नोंदणी कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशीपर्यंत पक्षाचे कार्यकर्ते अर्ज गोळा करतात. शेवटच्या तारखेला ते शेकडो अर्ज मतदार नोंदणी विभागात सादर करतात. त्यामुळे अर्जात छोटी मोठी चूक असल्यास ते अर्ज सरळ बाद ठरविण्यात येतात. त्यामुळे अनेकवेळा अर्ज करुनही काहींचे मतदार ओळखपत्र तयार झाले नसल्याचे एक मतदार संघाच्या नोंदणी विभागाची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्य अटीवर सांगितले.
मतदार यादी कार्यक्रम
* 17 जूनप्रारुप मतदार यादी
* 25 जूनपर्यंत मतदार यादीवर आक्षेप
* 7 जुलै प्रभागनिहाय अंतिम यादी