नागपूर: नागपूर शहराच्या शेजारी असलेल्या हिंगणाच्या येथील भीमनगर इसासनीच्या नाल्याला रात्री आलेल्या पुरात आई मुलगी वाहून गेली आहे. सुकवन राधेलाल मातरे (वय 42)आणि त्यांची 17 वर्षीय मुलगी अंजली राधेलाल मातरे असे वाहुन गेलेल्यांचे नावं आहेत. यापैकी सुकवन यांचा मृतदेह घराच्या काही अंतरावर आढळून आला आहे तर त्यांची मुलगी अंजलीचा शोध घेतला जातो आहे.
काल दिवसभर आणि रात्री नागपूरसह संपूर्ण जिल्हात दमदार पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सर्वच नदी नाल्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे तर काहींना पूर आलेला आहे.
हिंगणा येथील भीमनगर इसासनीच्या नाल्याचे पाणी वाढल्याने अनेक घरांमध्ये पाणी घुसले होते. त्याच वेळी सुकवन आणि त्यांची मुलगी अंजली हे घराबाहेर पडले असता तोल जाऊन त्या पाण्यात पडल्या असाव्यात असा कयास लावला जात आहे.
मृतदेह आढळल्यानंतर घटना आली उघडकीस
आज सकाळी सुकवन राधेलाल मातरे यांचा मृतदेह घरापासून काही अंतर दूर पडलेला दिसून आल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती समजताच एमआयडीसी पोलिसांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले असून अंजलीला शोध घेतला जातो आहे.
चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये 'रेड अलर्ट'
आज रविवारसह पुढील दोन दिवसांसाठी चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये हवामान खात्याकडून रेड अलर्ड जारी करण्यात आला आहे. या अंतर्गत मुसळधार पावसासह मेघगर्जनेचाही अंदाज आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस चंद्रपूर आणि गडचिरोलीसाठी सतर्कतेचे ठरणार आहे. तर त्यानंतर बुधवारी दोन्ही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
'या' जिल्ह्यांत 'ऑरेंज अलर्ट'
नागपुरसह वर्धा, गोंदिया, यवतमाळ आणि वाशिमसाठी सोमवारी ऑरेंज अलर्ट असून शहरात दमदार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यासोबतच मेघगर्जनाही होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तर मंगळवारी अकोला, बुलढाणा आणि वाशिमसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. इतर जिल्ह्यांमध्ये मात्र येलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.