पिंपरी चिंचवड : हातात सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री, बांधकाम व्यवसायात 15 वर्षाचा अनुभव आणि महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल होत असताना हे सोडून कुणी फक्त शेती करेल का? अनेकांचं उत्तर नाही असंच असेल. पण पिंपरी चिंचवडमधील चव्हाण दाम्पत्याने वयाच्या चाळीशीत या प्रश्नाचं हो असं उत्तर दिलंय. सध्या ते मावळ तालुक्यातील इंगलून गावातील शेतीत रमलेत. त्यांची ही यशोगाथा अनेक खचलेल्यांना प्रेरणा देणारी ठरू शकते.


पिंपरी चिंचवडमधील रुपाली चव्हाण यांनी एमई सिव्हिल आणि श्रीकांत चव्हाण यांनी बी ई सिव्हिलची डिग्री घेतलेली आहे. पण सध्या हे चव्हाण दाम्पत्य मावळच्या शेतीत स्वप्न रंगवतायेत. खरं तर त्यांचे हात हे इतरांच्या स्वप्नांची घरं बांधून देताना दिसायला हवे होते. पण सध्या हे हात Anthuriam फ्लॉवर्स, स्ट्रॉबेरी, चेरी टोमॅटोसह अन्य फळभाज्यांच्या लागवडीत गुंतलेत. सिव्हिल इंजिनियरिंगची डिग्री घेतल्यानंतर चव्हाण दाम्पत्यांनी 1995 साली बांधकाम क्षेत्रात व्यवसाय सुरू केला. पिंपरी चिंचवड शहर आणि वडगाव मावळ तालुक्यातील अनेकांच्या स्वप्नातील घरं या दाम्पत्यांनी उभारली. पण भविष्यात शेती करायची असा ठाम निश्चय त्यांनी केला होता. म्हणूनच बांधकाम व्यवसायातील 15 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव गाठीशी असताना, 2000 साली त्यांनी शेती जगतात पहिलं पाऊल टाकलं.


वयाच्या चाळीशीत त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला. बांधकाम क्षेत्रातून शेती जगताकडे वळताना त्यांनी सेंद्रिय शेतीलाच प्राधान्य द्यायचं ठरवलं होतं. म्हणूनच देशी गाईंच्या संगोपणाला सुरुवात केली. मग यापासून खताची निर्मिती केल्याचं इंजिनियर शेतकरी श्रीकांत चव्हाण सांगतात. मग सेंद्रिय शेतीसाठी वेगवेगळी प्रशिक्षण ही घेतली आणि पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिल्याचं इंजिनियर शेतकरी रुपाली चव्हाण यांनी सांगितलं. 2015 मध्ये पॉलिहाऊसमध्ये Anthuriam फ्लॉवर्सची लागवड केली. त्यानंतर चेरी टोमॅटो, स्ट्रॉबेरी, मिरची, दुधी भोपळा अशा विविध फळभाज्यांच्या त्यात भर पडली. आज ते या शेतीतून वर्षाला नव्वद लाखांची आर्थिक उलाढाल करतायेत. नवनवे प्रयोग करून चव्हाण दाम्पत्यांनी शेतीत क्रांती घडवली आणि दहा वर्षांपूर्वी घेतलेला धाडसी निर्णय सार्थ ठरवला.


नोकरी असो की व्यवसाय करताना जोड धंद्याचा विचार करायला हवा. त्यात शेतीचा पर्याय निवडला तर तो नक्कीच फायद्याचा ठरू शकतो. आम्हाला ही शेतीचं म्हणावं तसं ज्ञान नव्हतं, पण आम्ही ते अवगत केलं. त्यामुळेच आज बांधकाम व्यवसायातून बाहेर पडल्याचा कोणताच पश्चाताप होत नाही. सेंद्रिय शेतीत आम्हाला समाधान मिळत आहे. आज या शेतीतून वर्षाला नव्वद लाखांची उलाढाल ही होत आहे, असं श्रीकांत चव्हाण यांनी सांगितलं.


केवळ गृहिणी म्हणून जगायचं नव्हतं, त्यामुळेच मी सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्री घेतली. घरकाम करून फिल्ड वर्कही केलं. आज शेती जगतातही अपेक्षित यश मिळालं. बाजाराचा अभ्यास केला तर प्रत्येक शेतकरी पारंपरिक शेतीतूनही अधिकचा पैसा कमावू शकतो, असं रुपाली चव्हाण सांगतात.