ठाणे : खरा बुलडोजर काय असतो हे दाखवायला आलो होतो, पण पोलिसांनी त्यांच्या मालकाचे संरक्षण केलं. नेभळटांनो तुमच्यात हिंमत असेल तर पोलिसांना बाजूला ठेवा आणि समोर या, मग दाखवतो असं थेट आव्हान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे गटाला दिलं.
पोलिसांनी आज या चोरांचं रक्षण केलं, पण या चोरांनी मशमाशीच्या पोळाला डिवचलं आहे, यांना फोडल्याशिवाय राहणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. येत्या निवडणुकीवेळी या चोरांचे डिपॉजिट जप्त करा असं उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं.
यांना सत्तेचा माज आला असून बुलडोजर लावून त्यांनी शिवसेनेची शाखा पाडली, खरा बुलडोजर काय असतो हे यांना दाखवण्य़ासाठी आलो होतो. पण पोलिसांनी त्यांच्या मालकाचे संरक्षण केलं असं उद्धव ठाकरे म्हणाले.
निवडणुकीत यांची मस्ती फाडतो
यांनी आपलं पोस्टर फाडलं, येत्या निवडणुकीत यांची मस्ती फाडतो असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. येत्या निवडणुकीत यांचे डिपॉजिट जप्त करा असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.
ही शाखा आपलीच आहे, त्याचे सर्व कागदपत्रे आपल्याकडे आहेत. आज त्यांनी भाड्याची माणसं आणून बॅरिकेट्सच्या मागे उभी केली, पण मर्दाची औलाद असाल तर समोर या, आमची तयारी आहे असं आवाहनही त्यांनी केलं. ही शाखा आपल्याकडेच राहणार असून या ठिकाणी रोज शिवसैनिक उभा राहणार असंही ते म्हणाले.
शिंदे गटाने मुंब्र्यातील शाखा ताब्यात घेतल्यानंतर आज उद्धव ठाकरे या ठिकाणी भेटीसाठी आले होते. उद्धव ठाकरे या शाखेपासून अवघ्या 10 ते 20 मीटरच्या अंतरावर होते. त्यावेळी दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. परिस्थिती पाहतो उद्धव ठाकरेंनी या शाखेपाशी येऊ नये असं आवाहन पोलिसांनी केलं. बराच वेळानंतर उद्धव ठाकरे मागे फिरले आणि नंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
मुंब्र्यातील शाखेचा नेमका वाद काय?
मुंब्रा इथं शिवसेनेची शाखा होती. राज्यातील सत्तांतर आणि शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोन गटात शिवसेना विभागली. त्यानंतर शाखा-शाखांवर दोन्ही गटांकडून दावा केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंब्र्यातील शाखेवर दोन्ही गटांनी दावा केला. 2 नोव्हेंबरला मुंब्य्रातील ठाकरे गटाच्या शाखेवर शिंदे गटाने ताबा मिळवत बुलडोझर फिरवल्याचा आरोप आहे.
आधीची शाखा जमीनदोस्त केल्यानंतर शिंदे गटाने त्याच ठिकाणी कंटेनर शाखा बसवली आहे. ही शाखा तात्पुरती असल्याचे सांगण्यात आले. मुंब्र्यातील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेतील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना बाहेर काढत शिंदे गटाने ही शाखा जेसीबीने जमीनदोस्त केल्याने गोंधळ उडाला होता.
मुंब्य्रातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आणि सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कट्टर समर्थक असणारे राजन किणे (Rajan Kine) यांच्या नेतृत्वाखाली 40 ते 50 जणांच्या जमावाने शाखेत घुसून शिवसेना ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखाला बाहेर काढल्याचा आरोप आहे. त्यानंतर शाखेवरील बोर्डही काढला आणि शिंदे गटाचा बोर्ड लावून शाखेत प्रवेश मिळवत कब्जा केल्याचा आरोप आहे.
VIDEO : Uddhav Thackeray Mumbra Shakha : आमच्या शाखेच्या जागेवर ठेवलेलंं खोकं उचलून फेकणार, ठाकरे आक्रमक