Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: ठाण्यातील शिवाई नगर या परिसरात शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्यावरून ठाकरे गट आणि शिवसेना आमने-सामने आले असून या ठिकाणी मोठा राडा झाला आहे. या राड्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ठाण्यातील शिवसेनेच्या शाखा नेमक्या कुणाच्या यावरुन आता वातावरण पुन्हा एकदा तापल्याचं दिसून येतंय. 


शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर अशा प्रकारच्या घटना घडतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. आता ठाण्यातील शिवाई नगरची शाखा ताब्यात घेण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. या ठिकाणी कोणताही अनूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला अशी ठाण्याची ओळख आहे. तसेच ठाकरे गटाचीही मोठी पकड या ठिकाणी आहे. एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी ठाकरे गटाच्या वतीनं खासदार राजन विचारे आणि केदार दिघे यांना ताकद दिली जातेय. 


शिवसेना शिंदे गटाचे नरेश मस्के यांची प्रतिक्रिया 


शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे आता एकनाथ शिंदे गटाला मिळाल्याने ठाकरे गटाचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचं शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के म्हणाले. ही शाखा प्रताप सरनाईक यांनी बांधली असून या ठिकाणचे नगरसेवक आपल्यासोबत असल्याने ही शाखा आमचीच असल्याचं ते म्हणाले. 


शिवसेना ठाकरे गटाच्या राजन विचारे यांची प्रतिक्रिया


ही शाखा 40 ते 50 वर्षांपूर्वी बांधली आहे. या शाखेच्या माध्यमातून अनेकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला गेला. आता ही शाखा काही जणांकडून प्रयत्न केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण असताना या गोष्टी होतात. या ठिकाणी सत्तेचा गैरवापर करुन बाहेरच्या लोकांकडून ही शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.  


ठाण्यातील लोकमान्य नगर शाखेवरूनही राडा 


या आधीही ठाण्यातील लोकमान्य नगर येथील शिवसेनेची 45 वर्ष हून अधिक जुनी असलेली शाखा ताब्यात घेण्यावरुन शिंदे गट आणि ठाकरे गट समोरासमोर आले होते. याबाबत ठाकरे गटाच्या वतीने ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. पोलीस आयुक्त जयजित सिंह यांना पत्रदेखील दिलं होतं. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी हे शिवसेना शाखा आणि इतर स्थावर गोष्टी ताब्यात घेणार नसल्याचे सांगत असताना अशा प्रकारे शाखा बळकावणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया खासदार राजन विचारे (rajan vichare) यांनी दिली होती. 


ही बातमी वाचा: