ठाणे : डोंबिवलीतील (Dombivli Crime News) एका कंपनीमध्ये फर्निचरचा ठेका बंद करुन तो दुसऱ्या ठेकेदाराला दिल्याच्या  वादातून पहिल्या ठेकेदाराने कंपनी मॅनेजरवर प्राणघातक हल्ला करण्यासाठी दोन सराईत गुंडाना सुपारी देऊन हल्ला केला होता. हा हल्ला सीसीटीव्हीत कैद झल्याने त्यावरूनच गुंडांची ओळख पटवून कल्याण गुन्हे शाखेच्या पथकेने सुपारीबाज दोन गुंडांसह ठेकरदार असे चार जणांना अटक करण्यात यश आले आहे. पंकज प्रल्हाद पाटील (31, ठेकेदार रा. सोनारपाडा), शैलेश रावसाहेब राठोड (30, रा. देशमुख होम्स, टाटा नाका, डोंबिवली), सुशांत लक्ष्मण जगताप (27, रा. दिलीप सदन, कोळसेवाडी,) महेश शामराव कांबळे (31, सोनारपाडा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली एमआयडीसीतील बीईडब्ल्यू कंपनीमध्ये तक्रारदार सुरेंद्र मौर्या (वय, 41)  हे मॅनेजर  म्हणून  कार्यरत आहेत. त्यातच  गेल्या महिन्यात 15 फेब्रुवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास कंपनीमधून काम आटपून आपल्या दुचाकीने घरी जात होते. त्याच सुमाराला एमआयडीसीतील म्हात्रेनगर येथे आल्यावर मॅनेजर मौर्या यांचा पाठलाग करून  दुचाकीवरुन दोन अज्ञात व्यक्तीने त्यांची अचानक दुचाकी थांबवून त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात मॅनेजर गंभीररित्या जखमी झाल्याचे पाहून हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला होता. मात्र हल्ल्याचे चित्रीकरण त्या परिसरात असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाले होते. 


हल्ल्यानंतर उपचारादरम्यान मॅनेजर  मौर्या यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात  तक्रार केली होती. त्या तक्रारीत मौर्या यांच्या कंपनीत आरोपी ठेकेदार पंकज पाटील याचे फर्निचर पुरवठ्याचे काम होते. हे काम काढून मौर्या यांनी दुसऱ्या ठेकेदाराला दिले होते. त्याचा राग पंकज यांच्या मनात होता. हा राग मनात ठेऊन पंकज, आणि शैलेश राठोड यांनी मॅनेजर मौर्या यांच्यावर हल्ल्याचा कट रचला होता. त्यानुसार गुंड  सुशांत जाधव, आणि महेश कांबळे या दोन हल्लेखोरांना मौर्या यांच्यावर हल्ला करण्याची सुपारी दिल्याचे पोलीस तपासात समोर आले. दरम्यान, कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणाचा गुन्हे शाखेने तपास  सुरू  केला होता. गुन्हे शाखेतील हवालदार गुरुनाथ जरग, विश्वास माने यांनी  मॅनेजर मौर्या यांच्यावर हल्ला झालेल्या  परिसरातील  सीसीटीव्ही फुटेज  तपासले असता, दोन इसम या परिसरात घुटमळत असल्याचे दिसले. त्यानंतर त्याचा माग त्या सीसीटीव्ही फुटेज आणि  तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने काढला होता.


त्यावेळी आरोपी डोंबिवली जवळील 27 गाव भागात असल्याची गुप्त माहिती जरग, माने यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे वरिष्ठ निरीक्षक शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहन कळमकर, साहाय्यक उपनिरीक्षक संजय माळी, हवालदार गुरुनाथ जरग, बालाजी शिंदे, विश्वास माने, प्रशांत वानखेडे, अनुप कामत, बापूराव जाधव, प्रकाश इदे, किशोर पाटील, सचिन वानखेडे, मिथून राठोड, एम. एस. बोरकर यांनी शनिवारी डोंबिवली पूर्वे कडील  सोनारपाडा, टाटा नाका भागात सापळा रचून  मुख्य आरोपींना अटक केली.


विशेष म्हणजे अटक चारही आरोपी सराईत गुन्हेगार असून ठेकेदार  पंकजवर मानपाडा आणि  भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. त्याचा साथीदार सुशांतवर नारपोली, मानपाडा, कोळसेवाडी पोलीस ठाण्यात पाच, तर सुपारी घेणारे गुंड शैलेशवर नारपोली, मानपाडा येथे चार, तर दुसरा गुंड महेशवर धारावी, नागपाडा पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरसाठ यांनी दिली आहे.