रत्नागिरी: एकनाथ शिंदे यांनी आता अमित शाह यांना वडील म्हटलंय, त्यामुळे ते आता आपली संपत्ती चोरणार का याची चिंता जय शाह यांना लागली आहे असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. तुम्हाला पक्षप्रमुख म्हणून कोण हवंय... मी की मिंधे असा सवालही त्यांनी विचारला. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह गेल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे रत्नागिरीतील खेड या ठिकाणी सभा घेतली. त्यावेळी त्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर तुफान टीका केली.
1. शिवसेना चोरू शकणार नाही...
उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्यांना शक्य ते दिलं, पण ते आता खोक्यात बंद झाले. आज माझे हात रिकामे आहेत, मी तुम्हाला काहीही देऊ शकत नाही. आज मी तुमच्याकडे मागायला आलोय. तुमची सोबत मला हवी आहे. जे भुरटे चोर, गद्दार आहेत, त्यांना मला सांगायचं आहे की, तुम्ही शिवसेना हे नाव चोरू शकाल, पण शिवसेना चोरू शकणार नाही. जिथे रावण आपटला तिथे मिंधे गटाचं काय?
2. निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य नाही
हा चुना लगाव आयोग आहे, सत्तेचे गुलाम आहेत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर केली. ते म्हणाले की, वरुन काय आदेश येईल त्याप्रमाणे वागणारे आहेत ते. या निवडणूक आयोगाचे वडील वरती बसले असतील पण शिवसेनेची स्थापना माझ्या वडिलांनी केलीय हे लक्षात ठेवा. निवडणूक आयोगाचा फैसला आम्हाला मान्य नाही.
3. ठेकणं चिरडायला एक बोट पुरेसं
उद्धव ठाकरे म्हणाले की, कोण होता हा भाजप? कोण होतं त्यांच्या मागे? बाळासाहेब त्यांच्या मागे राहिल्याने ते वाढले. ठेकणं चिरडायला तोफेची गरज नसते, त्यांना असंच चिरडायचं असतं. ही ठेकणं चिरडायला एक बोट पुरेसं आहे. ज्यांना आपलं कुटुंब मानलं त्यांनीच आपल्या आईवर हल्ला केला. ज्यांचं राजकीय आयुष्य गेल्या 10-15 वर्षात फुललं, ते आता आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवतात.
4. राज्याला कंगाल केलं...
उद्धव ठाकरे म्हणाले की, कानडी मुख्यमंत्र्यांनी डोळे वटारले आणि हे गप्प बसले. एक काळा टोपीवाला होता, त्याने शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला, त्यावेळी हे शेपट्या घालून बसले.
5. अर्धा वेळ दिल्लीत मुजरा करायला
तुमचा अर्धा वेळ फिरण्यामध्ये जातोय, अर्धा वेळ दिल्लीला मुजरा करायला आणि अर्धा वेळ ज्यांना खोकी मिळाली नाहीत, मंत्रीपदं मिळाली नाहीत त्यांना सांभाळायला जातो.
6. फुटलेल्या काचांवर गतीमान महाराष्ट्र जाहिरात
हे सरकार सत्तेत आल्यापासून सगळे उद्योग गुजरातला जातात, आता कर्नाटकात निवडणूक असल्याने आयफोनचा उद्योग तिकडे गेला. महाराष्ट्राला काहीच द्यायचं नाही, पण तुटलेल्या फुटलेल्या काचांच्या एसटीचे फोटो लावायचे आणि गतीमान महाराष्ट्र अशी जाहिरात करायची हेच यांचे उद्योग.
7. चोरांना आशीर्वाद देणार का?
आजपासून भाजप आणि शिंदे मुंबईत आशीर्वाद यात्रा काढतात, चोरांना तुम्ही आशीर्वाद देणार का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला. मेघालयात ज्या संगमांवर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्या मुलासोबत सत्तेसाठी गेले, दुसऱ्यांवर घराणेशाहीचे आरोप करायचे आणि आपण मात्र उलटच वागायचं.
8. शिवसेनाप्रमुख म्हणून मी हवा की मिंधे हवेत?
यांनी आपलं चिन्ह चोरलं, पक्ष चोरलं राज्यातल्या जनतेनं ठरवायचं आहे की शिवसेनाप्रमुख म्हणून मी हवाय की मिंधे हवेत. त्यांनी पक्ष चोरला, चिन्ह चोरलं पण ते शिवसेना चोरू शकणार नाहीत. हातात धनुष्यबाण घेतायत, पण कपाळावर लिहिलेलं गद्दार पुसलं जाणार नाही. जो कुटुंब बदलतो, तो राज्य काय बदलणार?
9. शिंदे आता जय शाह यांची संपत्ती चोरणार...
अमित शाह पुण्याला आले होते, त्यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, अमित शाह आपल्याला वडिलांसारखे आहेत. त्यामुळे आता जय शाह चिंतेत पडले असून त्यांचीही संपत्ती शिंदे चोरणार का याची काळजी त्यांना लागलीय.
10. मोदींच्या नावे महाराष्ट्रात मतं मागून दाखवा
शिवसेना नावाशिवाय, बाळासाहेबांच्या नावाशिवाय फक्त मोदींच्या नावाने महाराष्ट्रात मतं मागून दाखवा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी दिलं. तुमच्यात जर धमक असेल तर चोरलेलं धनुष्यबाण घेऊन या, मी माझी मशाल घेऊन येतो, बघुया कोण जिंकतंय? 2024 ची निवडणूक ही शेवटची संधी असेल. या निवडणुकीत जर पुन्हा भाजप आलं तर देशातील लोकशाही संपणार, त्यानंतर लोकांना मतदानाचा अधिकार मिळणार नाही. त्यानंतर देशात संपूर्ण हुकूमशाही येईल.
ही बातमी वाचा: