मुंबई : गणेश विसर्जन सोहळा आणि ईद-ए-मिलाद सण लागोपाठ आल्याने ठाणे पोलीस सज्ज झाले आहेत. दोन्ही सण शांततेत पार पडावी यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पोलिसांच्या विशेष ड्युट्या लावण्यात आल्या आहेत. ठाण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवर 9 हजार पोलिसांचा 24 तास वाच असणार आहे. तसेच महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून मिरवणुकीत साध्या वेशातील पोलिस देखील तैनात करण्यात येणार आहेत. 


लाडक्या बाप्पाची 10 दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर त्याला निरोप देण्याचा दिवस जवळ आला आहे. 17 सप्टेंबर रोजी ठाणे जिल्ह्यात सकाळपासून विसर्जन मिरवणूक निघणार आहेत. गणेशोत्सवाच्या विसर्जनासाठी जिल्हा,ठाणे महापालिका आणि पोलिस प्रशासन देखील सज्ज झाले आहे. यंदाच्या विसर्जनाच्या पार्श्‍वभूमीवर ठाणे पोलिसांकडून बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.


विसर्जनाच्या वेळी होणारी गर्दी लक्षात घेता सुरक्षा व्यवस्था पुर्णपणे मजबूत करण्यात आली आहे. जिल्यात 35 हजार 623 हुन अधिक घरगुती तर 1 हजार 500 सार्वजनिक गणेश मूर्तींचा विसर्जन सोहळा संप्पन होणार आहे. 


ठाणे पोलिस आयुक्त रस्त्यावर उतरणार


गणपती विसर्जनाच्या अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे हे स्वतः रस्त्यावर उतणार असून पाच परिमंडळातील चार अतिरिक्त पोलिस आयुक्त, 9 डीसीपी, 18 एसीपी तसेच सुमारे 125 पोलिस निरीक्षकांवर सुरक्षेची कमान सोपविण्यात आली आहे. याशिवाय एसआरपीच्या 5 कंपन्या, 4500 पोलीस कर्मचारी, 700 होमगार्ड आणि एक कंपनी रॅपिड अक्शन फोर्स हे विसर्जनासाठी रस्त्यावर असणार आहेत. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरातील मुख्य नाक्या-नाक्यावर,चौका-चौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.  


हालचालीवर सीसीटीव्हीची नजर


अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 9 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत गणेश मुर्तींचे विसर्जन पूर्ण होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, जिल्ह्यातील धार्मिक स्थळे आणि संवेदनशील भागात हालचालीवर सीसीटीव्हीची नजर असणार आहे. विसर्जन सोहळ्यात कोणतीही आडकाठी आणू नये. सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, याची सर्वोतोपरी काळजी घेण्यास सांगितले आहे. महिला, बालके यांच्यासह सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व खबरदारी पोलीस विभागाने घेतली आहे.


150 जणांना तडीपारीच्या नोटिस


पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात पोलिसांनी तडीपाराची कार्यक्रम हाती घेतला आहे. यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावे यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील 150 हून अधिक जणांना तडीपारीच्या नीटसा बजाविण्यात आल्या आहेत. गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेच्या वतीने संयुक्त मिशन तडीपारी ऑपरेशन राबवण्यात आले आहे.