ठाणे : मान्सूनची (Monsoon) चाहूल लागली असून दोन दिवसात मान्सून महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन सज्ज झालं आहे. ठाणे महापालिका (TMC) क्षेत्रातील बहुतांश मोठे आणि छोटे नाले, गटारे यांची सफाई पूर्ण होत आली आहे. दररोज वाहून येणारा तरंगता कचरा काढण्याचे काम दैनंदिन स्वरुपात केले जात आहे, अशी माहिती ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. अंतिम टप्प्यात असलेल्या नालेसफाईच्या कामांची पाहणी राव यांनी केली.  


नालेसफाईची बहुतांशी कामे पूर्ण


सौरभ राव यांनी सांगितलं की, गेले सुमारे महिनाभर नालेसफाई सुरू आहे. सर्व प्रभागात विविध एजन्सीच्या माध्यमातून नालेसफाई करण्यात आली आहे. त्यावर घनकचरा विभाग आणि वरिष्ठ अधिकारी यांची देखरेखही होती. मी स्वत: वेगवेगळ्या भागातील नाल्यांच्या कामांची पाहणी केलेली आहे. काही ठिकाणी जिथे नाल्यांची तोंडे बंद होतात, तिथे जाळ्या लावून ठराविक काळाने तरंगता कचरा काढण्यात येत आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह विनाअडथळा सुरू राहील, असेही आयुक्त राव यांनी सांगितले.


ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडून पाहणी


नाल्यांच्या पाहणी दरम्यान काही ठिकाणी काही ठिकाणी गटारांचे रुंदीकरण, नाल्यांचे बळकटीकरण अशी अल्प आणि दीर्घ मुदतीचे कामे हाती घेण्याची आवश्यकता असल्याचे लक्षात आले. त्यामुळे आता त्यादृष्टीने अल्प मुदती आणि दीर्घ मुदतीत करायच्या उपाययोजना यांचे नियोजन सुरू आहे. अल्प मुदतीतील कामांचे नियोजन पावसाळ्याच्या काळात करण्यात येईल. पावसाळा संपल्यानंतर त्यावर कार्यवाही केली जाईल, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर, दीर्घकालीन उपायांसाठी आता पूर्ण महापालिका क्षेत्राचा पूर कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. नागरीकरणाचा वेग, वाहतुकीची व्यवस्था आणि विकास कामे यांच्यामुळे लोकसंख्येची घनताही वाढते आहे. त्यामुळे जुने नाले, नैसर्गिक नाले आता अरुंद होत आहे. त्यांचा नव्याने अभ्यास करून जिथे जिथे त्यात अडथळे दूर करण्यासाठी हस्तक्षेप करण्याची गरज आहे, तिथे तो करून दीर्घकालीन उपाय केले जातील. त्याचेही नियोजन सुरू केले आहे.


दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येतील


जुन्या ठाण्यातील जांभळी नाका येथील पेढ्या मारुती मंदिराचा परिसर हा सखल भाग आहे. तिथे बशीसारखा आकार झाला आहे. सगळे रस्ते तिथे एकत्र येतात. पावसाचे पाणी सगळीकडून इथे येते. गटाराचे चेंबर्स अरुंद आहेत. खाडीकडे पाणी वाहून नेणारा आउटलेटही अरुंद झाला आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या परिस्थितीवर उपाय करण्यासाठी एकात्मिक योजना तयार करणे आवश्यक आहे. त्यासाठी आयआयटी, आपले सल्लागार, वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक, व्यापारी या सगळ्यांची चर्चा करून दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येईल, असेही आयुक्त राव यांनी सांंगितले. वृदांवन सोसायटी ऋतू पार्क येथील नाला, राबोडी-रुस्तमजी येथील नाला, के व्हिला येथील कारागृहालगतचा नाला, कोपरीमधील ब्रिम्स येथील नाला, पासपोर्ट कार्यालयालगतचा नाला, पेढ्या मारुती मंदिर परिसर यांची आयुक्त राव यांनी पाहणी केली. पेढ्या मारुती मंदिरापाशी नागरिकांशीही संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. 


आपत्कालीन कक्ष कार्यान्वित


मान्सूनसाठी ठाणे महापालिकेने पूर्वतयारी केलेली आहे. त्या आधारावर आपण मान्सूनचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत. साधारणपणे पुढील चार महिने 48 दिवस मोठ्या भरतीचे आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा पाच ते दहा टक्के पाऊस जास्त पडणार आहे. हे एक मोठे आव्हान असेल. पण अतिरिक्त पावसाचा सामना करण्यासाठीही आपली यंत्रणा सज्ज आहे. 


आपत्कालीन हेल्पलाईन


1 जूनपासून आपला आपत्कालीन कक्ष कार्यान्वित झाला आहे. त्यात महापालिका, पोलीस, महावितरण यांचे प्रतिनिधी त्यात 24 तास उपलब्ध राहणार आहेत. त्यामुळे पावसाळ्यात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर त्याचा सगळे एकत्रित सामना करू शकू असा विश्वास आयुक्त राव यांनी व्यक्त केला. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी 8657887101 या आपत्कालीन हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असं आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.