ठाणे: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) च्या वीज ट्रान्सफॉर्मरचे काही भाग चोरल्याची घटना घडल्यानंतर पोलिसांनी आता अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  ठाण्यातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये आरोपींनी ही चोरी केली असून त्याची एकूण किंमत 3 लाख रुपये आहे. मानपाडा पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


बुधवारी, 23 जानेवारी आणि 24 जानेवारीच्या मध्यरात्री आरोपींनी एका खासगी कंपनीत ठेवलेल्या महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरचे (Maharashtra State Electricity Distribution Company Ltd- MSEDCL) पार्ट चोरून नेल्याची पहिली घटना घडली. दुसरी घटना बुधवारी पहाटे डोंबिवलीतील देतुटणे गावात घडली असून आरोपींनी ट्रान्सफॉर्मर उघडून त्यातून तांब्याची तार आणि इतर साहित्य चोरले.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरी झालेल्या साहित्याची एकूण किंमत 3,03,045 रुपये इतकी असून भारतीय दंड संहिता (IPC) कलम 379 (चोरी) आणि 427 अन्वये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


ठाण्यात आणखी एका ठिकाणी पासपोर्ट नूतनीकरणाच्या बदल्यात पैसे स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau-ACB) दोघांना अटक केली. याप्रकरणी मुंबईतील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयातील एजंट आणि डेटा एन्ट्री ऑपरेटरला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने गुरुवारी दिली.


रत्नागिरीच्या एका रहिवाशाच्या तक्रारीनंतर त्या दोघांना अटक करण्यात आली आहे, त्यांच्या पासपोर्ट नूतनीकरणाची मागणी ऑनलाइन अर्जांमध्ये फेटाळण्यात आली होती. पीडितेने तक्रार केली की, सुरुवातीला एजंटने चुका दुरुस्त करण्यासाठी डेटा एंट्री ऑपरेटरकडे 1.8 लाख रुपयांची मागणी केली. तसेच कमिशन म्हणून पाच हजार रुपये मागितले. वाटाघाटीनंतर या प्रकरणी 80 हजार रुपये देण्याचं ठरलं. ACB ने वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयात सापळा रचला आणि 45 हजार रुपये स्वीकारताना एजंट शेखर नेवे आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर, प्रकाश जरीमंडल यांना अटक केली.