ठाणे: भिवंडी शहरात काल रात्रीपासून एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता. या व्हिडीओमध्ये एक भूत टेरेसवर (Bhiwandi Viral Video Of Ghost) जाताना दिसत असल्याचा भासत आहे असा दावा करण्यात आला होता. हा व्हिडीओ परिसरात व्हायरल झाल्यानंतर भीतीचे वातावरण पसरले होते. पण नंतर याची पडताळणी केल्यानंतर ती चटई असल्याचं समोर आलं. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. मात्र काही काळ का असेना या व्हिडीओमुळे अनेकांची घाबरगुंडी मात्र उडाल्याचं दिसून आलं. 


भिवंडीतील एका टेरेसवर भूत जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे संबंधित इमारतीतील सदस्य एवढे घाबरले की इमारतीचे टेरेस देखील बंद केलं. भिवंडीत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू असताना हा व्हिडीओ इमारतीच्या समोरील एका खिडकीमधून बनवण्यात आला. त्यावेळी हा क्षण कॅमेरात कैद झाला, त्यामध्ये एका भूतासारखी प्रतिमा दिसत होती. परंतु या व्हिडीओची पडताळणी जेव्हा करण्यात आली तेव्हा असं लक्षात आलं ते काही भूत नसून टेरेसवर वाळत ठेवण्यात आलेली चटई आहे.


भिवंडी शहरात दोन दिवसापूर्वी रात्रीच्या सुमारास सोसाट्याच्या वारासह मुसळधार पाऊस आला आणि पावसाचा क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपण्यासाठी इमारतीच्या खिडकीतून व्हिडीओ बनवण्यात आला. 


परंतु हाच व्हिडीओ थोड्या वेळात भूत असल्याचं सांगत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला. हा व्हिडीओ भिवंडी शहरातील मौलाना आझाद नगर परिसरातील उमर अपार्टमेंट येथील आहे .व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर परिसरात लोक घाबरले होते. विशेषतः लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण मोठ्या प्रमाणात पसरले होते. हा व्हिडीओ एबीपी माझापर्यंत पोहोचल्यानंतर या व्हिडीओची तपासणी करण्यास सुरुवात झाली. व्हिडिओ ज्या ठिकाणावरून काढला होता त्या परिसरातातील इमारतीमध्ये गेल्यानंतर त्या इमारतीतील लोक घाबरल्याचं दिसून आलं.


भीतीमुळे त्या लोकांनी टेरेस बंद केलं. नंतर टेरेस उघडल्यानंतर जे दिसलं ते आश्चर्यचकित करणारं होतं. या ठिकाणी कोणतंही भूत नसून ती चटई होती. याच इमारतीत राहणाऱ्या एका महिलेने चटई भिजली म्हणून टेरेसच्या सुरक्षा भिंतीवर वाळत ठेवली होती आणि सोसाट्याचा वारा सुरू झाल्याने ही चटई हवेत उडून पुन्हा टेरेसवर आली. हे जेव्हा इमारतीतील सदस्यांना लक्षात आले त्यावेळी त्यांच्या मनातून भूताचा भ्रम दूर झाले आहे. एकंदरीत व्हिडीओमध्ये व्हायरल होत असलेला मेसेज हा चुकीचा असून त्यात कोणी भूत नसून ती चटई असल्याने परिसरातील नागरिकांनी देखील सुटकेचा निश्वास घेतला आहे.