Shiv Sena-BJP Alliance : राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षांकडून मतदारसंघावर दावे केले जात आहेत. याचेच पडसाद भाजप-शिवसेना युतीत उमटताना पहायला मिळत आहेत. भाजपकडे (BJP) सक्षम उमेदवार असल्यास आपण राजीनामा देण्यास तयार असल्याचं कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी सांगत, युतीतील मतभेद उघड केले होते. मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्रीकांत शिंदे हेच कल्याण लोकसभेचे उमेदवार असल्याचं स्पष्ट करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु भाजप नेत्यांकडून अद्यापही कल्याण लोकसभा मतदारसंघावर (Kalyan-Dombivli Lok Sabha Constituency) दावा केला जात आहे. काल भाजपच्या मेळाव्यात बोलताना भाजपचे आमदार संजय केळकर यांनी ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे.


पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करुन प्रतिसाद


मोदी सरकारने नऊ वर्षांत राबवलेल्या विविध योजनांचा प्रचार करण्याच्या उद्देशाने भाजपने ठाणे लोकसभा मतदारसंघात रविवारी (11 जून) मेळाव्याचं आयोजन केलं होतं.  या मेळाव्याला ठाणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि सहाही विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाणे आणि कल्याण हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ आपले होते आणि यापुढेही राहतील, असा दावा भाजप आमदार संजय केळकर यांनी करताच मेळाव्याला उपस्थितीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देऊन त्याला प्रतिसाद दिला.


केळकरांच्या दाव्याने शिंदे गटाची कोंडी होणार?


मेळाव्यात बोलताना संजय केळकर म्हणाले की, ठाणे, कल्याण  आणि पालघर लोकसभा मतदारसंघ हे आपले होते आणि यापुढेही राहतील. यावर उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देऊन त्याला प्रतिसाद दिला. त्यामुळे आधी कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघावर दावा सांगणाऱ्या भाजपने आता थेट ठाणे आणि पालघर मतदारसंघावरही दावा सांगितला आहे. त्यामुळे शिंदे गटाची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


संजय केळकर यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव न घेता म्हटलं की, नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही काम करत आहोत, अशी बतावणी काही लोक करत आहेत. आरोप करण्यापेक्षा पंतप्रधान मोदींनी आणलेल्या योजना राबवा, असा सल्लाही त्यांनी शिंदे यांना दिला. तसंच भाजपशिवाय या जिल्ह्यात कोणीही निवडून येऊ शकत नाही, असा दावाही त्यांनी केला.


ठाणे भाजपचा बालेकिल्ला


ठाणे लोकसभा मतदारसंघ जिंकणं अवघड नाही, त्यात मोठी संघटनात्मक ताकद आणि निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यामुळे ठाणे जिल्हा नेहमीच भाजपचा आहे हे विरोधकांना दाखवून द्यायचं आहे. आपली इथे अस्तित्वाची लढाई असून या लढ्यात भाजप कार्यकर्त्यांनी कमकुवत होता कामा नये. त्यांनी आपला संकल्प सोडू नये. त्यांनी बूथवर जाऊन आपली लढाई लढली पाहिजे, असा सल्ला भाजप नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. याचवेळी ठाणे जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला असल्याची आठवण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी करुन दिली.


VIDEO : Sanjay Kelkar Speech : कल्याण लोकसभा भाजपचीच, Shrikant Shinde यांच्यावर भाजपची पुन्हा कुरघोडी