ठाणे : जोशी-बेडेकर कॉलेजमध्ये एनसीसी कॅडेट्सना मारहाणप्रकरणी ट्रेनर प्रजापतीचं निलंबन करण्यात आले आहे. ठाण्यातील जोशी बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या कॅडेट्सना मारहाणीप्रकरणी युवासेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी कॉलेजला टाळं ठोकण्याचा प्रयत्न केला. कॉलेज व्यवस्थापनाला या घटनेचं अजिबात गांभीर्य नाही, त्यामुळे त्यांना धडा शिकवणं गरजेचं आहे, अशी संतप्त भावना युवासेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयात NCC च्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण होत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. मारहाणीविरोधात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं आंदोलन केलंय.राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्याा कार्यकर्त्यांनी जोशी बेडेकर महाविद्यालयात शिरून घोषणाबाजी केली. यावेळी प्राचार्यांच्या निलंबनाची मागणीही करण्यात आली. प्राचार्यांच्या दालनाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या दिला. महाविद्यालयात झालेल्या अमानुष मारहाणप्रकरणी नवीन खुलासा झाला आहे. मारहाण करणारा तरुण महाविद्यालयाचा नसल्याची माहिती समोर आली आहे. दुपारी 12 नंतर मनसेचे पदाधिकारी देखील जोशी-बेडेकर महाविद्यालयात जाणार आहेत असं कळतंय.
जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात एनसीसी कॅडेट्सना सेनादल आणि नौदलाच्या पद्धतीनं प्रशिक्षण देण्यात येतं. त्यात एखादी चूक झाली तर अमानुष मारहाण करण्यात येते. या व्हिडिओत कॉलेज कॅम्पसमध्ये साचलेल्या पाण्यात एनसीसी कॅडेट्सना उलटं झोपायला लावले. त्यावेळी एक सीनियर कॅडेट त्या ज्युनियर कॅडेट्सना एका दांडक्यानं झोडपून काढत आहे. कॉलेजच्या एका विद्यार्थ्यानं हा प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपला आहे.ही अमानवी मारहाण करणाऱ्या सीनियर कॅडेटवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन प्राचार्य सुचित्रा नाईक यांनी दिलंय. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या प्रकारावर संताप व्यक्त केलाय.
ठाण्यातल्या जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या एनसीसीमध्ये असे प्रकार घडू नये यासाठी समितीची स्थापना केली जाणार असल्याचं प्राचार्यांनी सांगितलं आहे. "एनसीसीचे हेड जे असे असतात ते सिनियर विद्यार्थीच असतात, ते कोणी शिक्षक नसतात. मात्र मारहाणीचा हा अत्यंत घृणास्पद असा प्रकार झाला आहे. यामुळे एनसीसीच्या मार्फत जी चांगली कामं होतात ती झाकोळली गेली आहेत. शिक्षक नसताना झालेला हा प्रकार असून त्या विद्यार्थ्यावर तात्काळ कारवाई करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांबाबत असे प्रकार घडले असेल त्यांनी अजिबात घाबरून जाऊ नये आम्हाला येऊन भेटावे. एनसीसी सोडण्याचा विचार अजिबात करु नये, असे कॉलेजच्या प्राचार्या सुचित्रा नाईक यांनी सांगितले.