Thane : ठाण्यातील (Thane) तीन हात नाका (Teen Hath Naka) तसेच भास्कर कॉलनी (Bhaskar Colony) ते ज्ञानसाधना महाविद्यालय (Dnyanasadhana College) अशा अतिशय वर्दळीच्या मार्गावरील वाहतूक सुरळीत करणारा पूर्व द्रुतगती महामार्गाखालील भुयारी मार्ग (Under Pass) आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. हा भुयारी मार्ग ठाण्यातील (Thane) महत्त्वाचा भुयारी मार्ग आहे. आता हा भुयारी मार्ग वाहतुकीसाठी सुरू झाल्याने ठाणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे.
ज्ञानसाधना महाविद्यालयासमोरील भुयारी मार्ग वाहतुकीसाठी सुरू व्हावा यासाठी नागरिक गेल्या पाच वर्षांपासून प्रतीक्षा करत होते. या नागरिकांची पाच वर्षांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आहे. ज्ञानसाधना महाविद्यालयाचे विद्यार्थी, तसेच कोपरीकडून तीन हात नाका येथे येणाऱ्या वाहनांना या भुयारी मार्गाचा वापर करता येणार आहे.
ठाणेकरांना मिळणार वाहतूक कोंडीतून दिलासा
ज्ञानसाधना महाविद्यालयासमोरील भुयारी मार्गामुळे मल्हार सिनेमा, हरी निवास या भागावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल. कोपरी, आनंदनगर, बारा बंगला, ज्ञानसाधना महाविद्यालय, मनोरुग्णालय या भागातील नागरिकांना तीन हात नाका या अत्यंत वर्दळीच्या मार्गाने वाहतूक करावी लागत होती.
तीन हात नाका येथे गर्दीच्या वेळी प्रती तास 13 हजार वाहने येजा करतात. त्यामुळेच, कोपरी येथील रेल्वेवरील पुलाचे रुंदीकरण आणि बांधकाम या अंतर्गत ज्ञानसाधना महाविद्यालय येथे भुयारी मार्गाचे (अंडर पास) काम 'एमएमआरडीए'ने (MMRDA) हाती घेतले होते. त्यासाठी सुमारे सहा कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
ज्ञानसाधना महाविद्यालयासमोरील भुयारी मार्ग हा ठाण्यातील एक महत्त्वाचा भुयारी मार्ग आहे. हा भुयारी मार्ग पूर्व ते पश्चिम जोडणारा मार्ग आहे. हा महत्त्वाचा भुयारी मार्ग बंद असल्याने गेली काही वर्षे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोडीं होत होती. याचाच परिणाम तीन हात नाका परिसरातील वाहतूक कोंडीवर होत होता. पण आता या भागातील नागरिकांची या वाहतूक कोंडीपासून सुटका झाली आहे. ठाणेकरांसह ज्ञानसाधना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळाला आहे. याच भुरारी मार्गामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या वतीने थ्रीडी चित्रीकरण करण्यात आलेलं आहे. एकंदरीतच विद्यार्थी आणि नागरिकांसाठी हा महत्त्वाचा भुयारी मार्ग आहे.