Ravindra Chavan on Shinde -BJP Disputes: रविवारी कल्याण लोकसभा मतदार संघात भाजपच्या (BJP) वतीने जनसभेचे आयोजन करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून स्थानिक शिंदे आणि भाजप गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. पण या वादावर वरिष्ठ नेत्यांनी बैठक घेऊन वाद मिटल्याचं देखील जाहीर केलं.
याच पार्श्वभूमीवर शिंदे आणि भाजपमध्ये झालेल्या वादावर पत्रकारांनी भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांना प्रश्न विचारला असता त्यांनी या विषयावर बोलणं टाळल्याचं यावेळी दिसून आलं. यावेळी रविंद्र चव्हाणांनी म्हटलं की, 'मला माहिती नाही काय वाद होता आणि काय मिटलं तेही माहिती नाही.' 'भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी संपूर्ण देशामध्ये एनडीएच्या असणाऱ्या प्रत्येक उमेदवार जिंकला पाहिजे या दृष्टिकोनातून संघटनात्मक रचना करण्यासाठी गेली अनेक वर्ष झटतोय', असं उत्तर मंत्री चव्हाण यांनी देऊन भाजप शिंदे गटाच्या वादाविषयी अधिक बोलणं टाळल्याचे दिसून आले आहे.
मोदी @9 या जनसंपर्क अभियानाचा एक भाग म्हणून प्रत्येक लोकसभा मतदारसंघांमध्ये एक जनसभा घेण्याच्या दृष्टीने केंद्रीय नेतृत्वाने निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे अंबरनाथमधील शिवमंदिर परिसरात रविवारी संध्याकाळी चार वाजता भाजपच्या वतीने जनसभेचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याण लोकसभेमध्ये असणाऱ्या सहा विधानसभा बुथवर भाजपचा संघटनात्मक ताकद असल्याचं चित्र आहे. त्यामुळे या प्रत्येक बुथवरील कार्यकर्ता या जनसभेला येणं अपेक्षित आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी 'घर चलो'अभियान हे 10 जुलैपर्यंत राबवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला त्यासाठी मेहनत घ्यावी लागणार अलसल्याचं देखील यावेळी रविंद्र चव्हणांनी म्हटलं. दरम्यान कार्यकर्ते हे गेल्या नऊ वर्षामध्ये पंतप्रधानांनी देशासाठी कोणती कामं केली याची माहितीदेखील हे कार्यकर्ते देणार असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने प्रत्येक भागात जाऊन याविषयी लोकांना माहिती द्यावी याविषीचे मार्गदर्शन कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे, अशी माहिती देखील मंत्री रविंद्र चव्हाणांनी यावेळी दिली.
दरम्यान, ऑपरेशन लोटस ते शिंदेंची बंडखोरी याचे साक्षीदार असलेले डोंबिवलीचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना ऑपरेशन लोटस ते शिंदेंची बंडखोरी यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, त्यांनी 'भारत माता कि जय' म्हणून बोलणं टाळत पत्रकार परिषद आटोपती घेतली.