Nanded News : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उद्या (25 जून) रोजी नांदेड जिल्ह्याच्या (Nanded District) दौऱ्यावर असणार आहे. यावेळी विविध योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ वाटप कार्यक्रम आणि 'शासन आपल्या दारी' उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली अबचलनगर येथील मैदानावर शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.
एकाच छताखाली शासनाच्या सर्व योजनांची माहिती मिळावी या उद्देशाने सरकारकडून 'शासन आपल्या दारी' हे उपक्रम राबवण्यात येत आहे. तर शासकीय योजनांची परिपूर्ण माहिती जोपर्यंत लाभार्थ्यांना होत नाही तोपर्यंत त्या योजनांप्रती लाभार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होत नाही. शासकीय योजनांच्या निकषानुसार पात्र लाभार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्यासमवेत ग्रामपंचायत पातळीपर्यंत योजनांचा जागर पोहचावा या उद्देशाने नांदेड येथे भव्य प्रमाणात 'शासन आपल्या दारी' याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातुन नागरिक मोठया संख्येने सहभागी होणार आहेत. तर यावेळी होणाऱ्या सभेत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे भाषण होणार आहे.
अशी तयारी करण्यात आली...
या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांच्या मार्फत ग्रामपंचायत व ग्रामस्थांशी संपर्क साधण्यात आला आहे. शहरात नगरपरिषदेच्या माध्यमातून तर नांदेड येथे महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांशी समन्वय साधला गेला आहे. मनपा क्षेत्रातून 15 हजार, नगरपालिका क्षेत्रातून 10 हजार व ग्रामीण भागातून 20 हजार नागरिकांसाठी नियोजन करण्यात आले आहे. शासकीय योजनाच्या या महामेळाव्यास 75 हजार नागरिक येवू शकतील यादृष्टीने जिल्हा प्रशासनातर्फे नियोजन केले गेले आहे. ग्रामीण भागासाठी सद्यस्थितीत चारशे बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. नांदेड येथील वाहतुकीला कोणताही अडथळा होऊ नये यादृष्टिने संपूर्ण नियोजन केले असून, उष्णता व पावसाची शक्यता याबाबी विचारात घेवून भव्य मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे.
अशी असणार वाहतूक व्यवस्था...
- लोहा, कंधार तालुक्यातून येणाऱ्या वाहनांसाठी यात्री निवास येथे वाहनतळाची व्यवस्था केली आहे. ही वाहने भगतसिंग चौक-कौठा-एसपी ऑफीस-शिवाजी पुतळा-चिखलवाडी कॉर्नर-यात्री निवास या मार्गाने येतील.
- धर्माबाद, उमरी येथून येणाऱ्या वाहनांसाठी यात्री निवास येथे वाहनतळाची व्यवस्था केली आहे. या तालुक्यातून येणारी वाहने नमस्कार चौक-शाहीर अण्णाभाऊ साठे चौक-हिंगोली उड्डाणपुलावरून पुढे डावीकडे वळून यात्री निवास येथे थांबतील.
- नायगाव, मुखेड येथून येणाऱ्या वाहनांसाठी बाबा फत्तेहसिंघजी मंगल कार्यालय अबचलनगर नांदेड येथे वाहनतळाची व्यवस्था केली आहे. ही वाहने चंदासिंग कॉर्नर-लातूर फाटा-जुना मोढा-अबचलनगर कमान येथून येतील.
- किनवट, माहूर येथून येणाऱ्या वाहनांसाठी बाबा फत्तेहसिंघजी मंगल कार्यालय अबचलनगर नांदेड येथे वाहनतळाची व्यवस्था केली आहे. ही वाहने नमस्कार चौक-शाहीर अण्णाभाऊ साठे चौक-हिंगोली उड्डाणपुलावरून पुढे डावीकडे वळून यात्री निवास-अबचलनगर कमान-फतेहसिंह मंगल कार्यालय येथे थांबतील.
- सर्व शासकीय वाहने यांच्यासाठी बाबा फत्तेहसिंघजी मंगल कार्यालय अबचलनगर नांदेड येथे वाहनतळाची व्यवस्था केली आहे.
- नांदेड ग्रामीण भागातून येणाऱ्या वाहनांसाठी कापूस संशोधन केंद्र (सीआरसी) येथे व्यवस्था केली आहे. ही वाहने देगलूर नाका-सीआरसी गेट क्र. 1 द्वारे बाफना फ्लाय ओहर मार्गे गेट क्र. 1 द्वारे प्रवेश करतील. मुदखेड येथून येणाऱ्या वाहनांसाठी कापूस संशोधन केंद्र येथे व्यवस्था करण्यात आली असून ही वाहने देगलूर नाका-सीआरससी गेट क्र. 2 द्वारे प्रवेश आहे.
- बिलोली, देगलूर, भोकर येथून येणाऱ्या वाहनांसाठी वाहनतळाची व्यवस्था बाबा पेट्रोलपंप, कापूस संशोधन केंद्रासमोर करण्यात आली आहे. ही वाहने देगलूर नाका मार्गे डावीकडे वळून आत प्रवेश करतील.अर्धापूर, हदगाव, हिमायतनगर येथून येणारी वाहने खालसा हायस्कूल नांदेड येथे थांबतील. ही वाहने नमस्कार चौक-शाहीर अण्णाभाऊ साठे चौक-फ्लाय ओहर-म्युझीयम-हिंगोली फ्लाय ओहर खालून उजवीकडे वळून प्रवेश आहे.
- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड यांच्यासाठी हिंगोली गेट मैदान नांदेड येथे थांबतील. पदाधिकारी खाजगी वाहने (चार चाकी व दुचाकी) यांच्या वाहनांची व्यवस्था हिंगोली गेट मैदान नांदेड येथे व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: