मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या कल्याण-डोंबिवली मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेत सारं काही आलबेल नसल्याचं चित्र आहे. डोंबिवलीतील काही नेत्यांकडून शिवसेना-भाजप युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. आपल्या पदाचा राजीनामाही देण्याची तयारी असल्याचं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले. 


डोंबिवलीत एका भाजप पदाधिकाऱ्यावर त्यांच्याच पक्षाच्या महिला कार्यकर्तीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामागे शिवसेनेतील शिंदे गटाचा हात असल्याचा आरोप करत भाजपने डोंबिवलीत मोर्चा काढला. तसेच यापुढे शिंदे गटाला सहकार्य करणार नसल्याचा ठराव स्थानिक कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यावरुन आता शिवसेना आणि भाजपमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 


नेमक्या याच कारणामुळे संतापलेल्या श्रीकांत शिंदेंनी थेट आपल्या खासदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे. शिवसेना-भाजपच्या युतीत क्षुल्लक कारणांसाठी मिठाचा खडा टाकण्याचं स्वार्थी राजकारण डोंबिवलीतल्या काही नेत्यांकडून सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 


खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, "2024 साली नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा या देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान करण्याचा आमचा आणि देशातील तमाम जनतेचा निर्धार आहे . त्यासाठी आम्ही प्राणपणाने प्रयत्न करू. परंतु, काही शुल्लक कारणांसाठी शिवसेना - भाजप युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे स्वार्थी राजकारण डोंबिवलीतल्या काही नेत्यांकडून सुरू आहे. मला व्यक्तीशः कोणत्याही पदाची लालसा नाही. येत्या लोकसभेच्या निवडणूकीत कुणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय शिवसेना - भाजप युतीचे वरिष्ठ नेते घेतील. मला उमेदवारी दिली नाही तरी जो कुणी उमेदवार असेल त्याचा एकदिलाने आम्ही प्रचार करू आणि त्याला विजयी करू."


केंद्रात पुन्हा भाजप- शिवसेना युती आणि मित्र पक्षाचे सरकार स्थापन करणे हेच आमचे ध्येय आहे. त्या दिशेने आम्ही करत असलेल्या कामांना जर कुणाचा विरोध असेल, कुणाला पोटदुखी होत असेल आणि युतीमध्ये जर विघ्न निर्माण होत असेल तर माझ्या पदाचा राजीनामा देण्याची माझी तयारी आहे असं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले. 


कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे निवडून येतात. पण हा मतदारसंघ भाजपला मिळावा, भाजपची या मतदारसंघात मोठी ताकद असल्याचा दावा भाजपने केला आहे. त्यामुळेच शिवसेनेकडून हा मतदारसंघ काढून घेण्याची तयारी भाजपने केली असल्याची चर्चा आहे.