Shrikant Shinde On Aditya Thackeray :  आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे अशी चर्चा सुरू असताना यावरुन आता राजकारण तापले आहे. या मुद्द्यावर कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी आपले मौन सोडले आहे. आदित्य ठाकरेंना नेमकं कुठून उभे राहायचे आहे असा सवाल त्यांनी उपस्थित करत आव्हान दिले आहे. 


कल्याण लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत. काही दिवसांपासून कल्याण लोकसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे निवडणूक लढणार आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. डोंबिवलीत आयोजित आगरी महोत्सव कार्यक्रमात खासदार श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटले की,  स्वप्न पाहणे यात काहीच गैर नाही. ज्यांना इकडे उभारायचं त्यांनी इकडे खुशाल उभं राहावं. ज्या ठिकाणी चांगली लढत हवी तर विरोधकही चांगला हवा. तरच लढाईला मजा आहे. मात्र, आधी कुठून उभे राहायचे हे आधी ठरवावे असा टोला शिेदे यांनी आदित्य ठाकरेंना लगावला. वरळीतून उभं राहायचे की ठाण्यातून उभा राहायचे  की कल्याण मधून उभं राहायचं, हे आधी त्यांनी निश्चित करावं. दररोज इथून उभे रहायचे, तिथून उभे रहायचे अशी वेगवेगळी वक्तव्ये राजकारणात चालत नसल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटले. 


विरोधकांकडे छातीठोकपणे सांगण्यासारखी कामेच नाहीत


कल्याण डोंबिवलीत जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, चांगले रस्ते, मेट्रो, फ्लाय ओव्हर उभारणे हे आपले ध्येय असून कोणती कामे केलीत कोणती कामे सुरू आहेत आणि कोणती होणार आहेत हे मी छाती ठोक पणे सांगू शकतो मात्र विरोधकांची तितकी हिंमत नाही कारण त्यांच्याकडे छातीठोक पणे सांगण्यासारखी कामेच नाहीत,  असेही खासदार शिंदे यांनी म्हटले. विरोधकांकडे टीका करण्याशिवाय काही दुसरे काम नाही म्हणूनच मी त्यांच्या टीकेकडे लक्ष देत नसल्याचे ही शिंदे यांनी म्हटले. यावेळी त्यांनी मनसे आमदार राजू पाटील यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली.