Priya Singh Case :  सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर प्रिया सिंह (Priya Singh) जीवघेणा हल्ला प्रकरणातील आरोपी अश्वजीत गायकवाड (Ashwajit Gaikwad) याला ठाणे पोलिसांनी (Thane Police) अटक केली आहे. कासारवडवली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणातील गुन्ह्यात वापरण्यात आलेली कारदेखील ठाणे पोलिसांनी जप्त केली आहे. आरोपी हा MSRDC चे सह-संचालक अनिलकुमार गायकवाड यांचा मुलगा आहे. त्यांचे राजकीय लागेबंध असल्याने पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात येत होता.


महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांचा मुलगा अश्वजीत गायकवाड याने मित्रांच्या मदतीने त्याच्या प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना माध्यमातून समोर आली होती. सोशल मीडियावर या प्रकरणाची मोठी चर्चा झाली. राज्य महिला आयोगानेदेखील पोलिसांकडून अहवाल मागवण्यात आला होता. त्यानंतर आज ठाणे पोलिसांनी कारवाई केली. ठाणे पोलिसांनी अश्वजीत गायकवाड, रोमिल पाटील आणि सागर शेडगे या आरोपींना रविवारी रात्री 8.53 वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली  स्कार्पिओ आणि लँड रोव्हर डिफेंडर कार तपासासाठी ताब्यात घेतली आहे.  पुढील तपास कासारवडवली पोलीस करीत आहेत. पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांच्या नेतृत्वातील विशेष तपास पथकाकडून अटक करण्यात आली. 


काय आहे प्रकरण? 


अश्वजीत आणि प्रिया यांच्यामध्ये गेल्या साडेचार वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. पण आपण विवाहित आहोत हे सत्य त्यानं प्रियापासून दडवून ठेवलं होतं. काही दिवसांपूर्वी तिला हे सत्य कळलं. तिनं अश्वजीतला अनेकदा कॉल केला, पण तो फोन घेत नव्हता. अखेर त्यानं फोन उचलला, आणि घोडबंदर रोडवरील ओवळा भागातल्या कोर्टयार्ड हॉटेलजवळ तिला बोलावलं. प्रिया तिथे गेल्यावर त्यांच्यात भांडण झालं आणि रागाच्या भरात अश्वजीतनं त्याचा ड्रायव्हर सागरला प्रियावर गाडी घालायला सांगितलं. सागरनंही त्याचं ऐकलं आणि भलीमोठी रेंज रोव्हर डिफेन्डर गाडी त्यानं तिच्या अंगावर घातली. 


त्यानंतर प्रियाला जखमी अवस्थेत सोडून आरोपी तिथून पळून गेले. अर्ध्या तासानं रस्त्यावरून जाणाऱ्या एकानं तिला पाहिलं आणि पोलिसांना बोलावलं. त्यानंतर प्रियाला रुग्णालयात नेण्यात आलं आणि तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी अश्वजीतचे काही मित्र रुग्णालयात जाऊन प्रियाला धमक्या देत असल्याचं समोर आलं. प्रियानं सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्यावर आलेल्या परिस्थितीला वाचा फोडली.