ठाणे: शहापूर जवळील माहुली गडावर अनेक पर्यटक ट्रेकिंगसाठी येत असतात, अशातच माहुली गडाच्या मागील धबधब्याच्या कुंडात बुडून दोन मित्रांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शहापूर (Shahapur) तालुक्यातील खोर गावच्या हद्दीत असलेल्या धबधब्याच्या कुंडात घडली आहे. या दोन मुलांसोबत त्यांची मैत्रीण देखील धबधब्यावर गेली होती, ती बचावली असल्याने हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी वाशिंद पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. कार्तिक नागभूषण रेड्डी-पाटील (वय, 22, रा. आंध्रप्रदेश), धनंजय दत्तात्रये गायकवाड ( वय 30, रा. मुरबाड) अशी दोन्ही मृतक मित्रांची नावं आहेत.


धबधब्याच्या कुंडात तोल जाऊन मृत्यू


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक कार्तिक आणि धनंजय हे दोघे मंगळवारी (22 ऑगस्ट) सायंकाळच्या सुमारास कल्याण तालुक्यातील कोलम गावात राहणाऱ्या 22 वर्षीय मैत्रिणीसोबत सहलीसाठी गेले होते. त्यावेळी शहापूर तालुक्यातील माहुली गडाच्या मागील बाजूस असलेल्या धबधब्याच्या कुंडाजवळ ते गेले, त्याच वेळी मृतक कार्तिक याचा तोल जाऊन तो पाण्याचा कुंडात पडला. हे पाहून त्याला वाचवण्यासाठी त्याचा मित्र धनंजयनेही कुंडात उडी घेतली आणि त्याला वाचवण्याचा प्रत्यन केला. मात्र दोघांनाही खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा कुंडात बुडून मृत्यू झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांनी दिली आहे. 


बचाव पथकाने संध्याकाळीच मृतदेह काढले बाहेर


दरम्यान, दोघांसोबत आलेल्या मैत्रिणीने नजीकच्या खोर गावात जाऊन घटनेची माहिती गावकऱ्यांना दिली. त्यानंतर पोलीस पाटील यांनी वाशिंद पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली आणि परिसरात असलेल्या बचाव पथकाला घटनास्थळी बोलावलं. सायंकाळचा अंधार होण्यापूर्वीच बचाव पथकातील प्रदीप गायकर, अमित तावडे, गजाजन शिंगेळे, ज्ञानेशवर कामोठे या पथकाने दोघांचे मृतदेह कुंडातून बाहेर काढले. त्यानंतर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शहापूरच्या उप-जिल्हा रुग्णालयात रवाना करून या घटनेची नोंद वाशिंद पोलीस ठाण्यात केली. घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांनी दिली आहे.


आठवडाभरापूर्वी राजगडावर पर्यटकाचा टाकीत पडून मृत्यू


राजगडावर फिरायला गेलेल्या एका तरुणाचा राजगड किल्ल्यावरील पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची घटना 15 ऑगस्टला घडली. अजय मोहनन कल्लामपारा (वय-33 रा. भिवंडी, ठाणे) असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो टाटा कंपनीत काम करत होता. सलग सुट्ट्यांमुळे अनेक पर्यटकांचे पाय पर्यटनस्थळांकडे होते, यामुळे किल्ल्यावर मोठी गर्दी झाली होती. ठाण्यातील चार पर्यटक पुण्याजवळील राजगडावर ट्रेकसाठी गेले होते. रात्रीचा ट्रेक होता. रात्रीच्या सुमारास अजय जवळच असणाऱ्या पाण्याच्या टाकीतील पाणी काढण्यासाठी गेला होता, त्यावेळी त्याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. मित्रांनी त्याचा बराच वेळ शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. शेवटी सकाळी तो पाण्याच्या टाकीत आढळून आला.


हेही वाचा:


Pune: प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी पाच वर्षांनंतर तुरुंगाबाहेर; गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या 800 कोटी रुपयांचं काय?