उल्हासनगर, ठाणे : महाराष्ट्र राज्यात आपत्कालीन मोफत वैद्यकीय आरोग्य सेवा 108 ( 108 Ambulance Service) ही 2014 पासून सुरु करण्यात आली आहे. ही रुग्णवाहिका चालवणारे चालक हे 2014 सालापासून अत्यंत कमी पगारात काम करत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र रुग्णवाहिका क्रमांक 108 वाहनचालक संघटनेने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले होते. मात्र, या विषयावर अद्याप देखील तोडगा न निघाल्याने महाराष्ट्रातील 108 रुग्णवाहिकेवर काम करणाऱ्या चालकांनी बेमुदत संप पुकारला असल्याची माहिती ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पस्टे यांनी दिली.
उल्हासनगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना संदीप पस्टे यांनी ही माहिती दिली. बीव्हीजी कंपनीकडून वाहन चालकांनी अत्यंत कमी पगार देत शोषण सुरू असल्याचा आरोप चालकांनी केला होता. याबाबतचे निवेदन वाहनचालकांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना दिले होते. याबाबत काय तोडगा काढण्यात येईल यावर चर्चा करण्यात आली होती.
त्यानंतर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी 25 जुलै रोजी बीव्हीजी कंपनीचे संबंधित प्रकल्पाचे संचालक, प्रशासकीय अधिकारी आणि वाहनचालक यांच्यासोबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये बीव्हीजी कंपनीने वाहन चालकांसोबत एक बैठक घेत त्यांच्या मागण्याबाबत योग्य विचार करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. मात्र आता महिना होत आले असले तरी देखील वाहनचालकांसोबत कोणतीही चर्चा बीव्हीजी कंपनीने केली नाही.
त्यानंतर '108 रुग्णवाहिका वाहनचालक संघटने'ने कंपनी सोबत पत्रव्यवहार करत वाहनचालकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात यावे असे निवेदन कंपनी व्यवस्थापनाला दिले होते. परंतु कंपनी प्रशासनाने रुग्णवाहिका चालकांच्या पत्राला कोणतीही दाद दिली नाही. कंपनीच्या या भूमिकेवर संतापलेल्या महाराष्ट्र रुग्णवाहिका 108 वाहनचालक संघटनेने 1 सप्टेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन आणि आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या बेमुदत आंदोलनामुळे रुग्णांना त्रास किंवा जीवितहानी झाल्यास याला सर्वस्वी बीव्हीजी कंपनी आणि महाराष्ट्र सरकार जबाबदार असणार अशी प्रतिक्रिया ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाष्टे यांनी दिली आहे.
जीवनवाहिनी ठरत आहे रुग्णवाहिका
राज्यात नागरिकांच्या 24 तास अत्यावश्यक सेवेसाठी 1000 रुग्णवाहिका ही तैनात केल्या आणि 108 हा हेल्पलाईन नंबरही सुरु केला. शासनाचा हा प्रकल्प भारत विकास ग्रुप अर्थात BVG या खाजगी कंपनीकडे चालवण्यासाठी दिला आहे. सुरुवातीला काही वर्षे हा प्रकल्प अत्यंत यशस्वी म्हणून समोर आला. रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत असल्याने लाखो रुग्णाचे प्राणही वाचले आहेत. मात्र, ही रुग्णवाहिका चालवणाऱ्या चालकांनी संपाचा इशारा दिल्याने ही रुग्णवाहिका सेवा ठप्प होण्याची भीती आहे.