पुणे: गुतवणूकदारांची 800 कोटींची फसवणूक करण्याचा आरोप असलेल्या डी. एस. कुलकर्णींची (D S Kulkarni) जामिनावर सुटका झाली आहे. नऊ हजार गुंतवणूकदारांची 800 कोटींना फसवणूक केल्याचा आरोप असलेले पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी पाच वर्षांनंतर जामीन मिळवून तुरुंगातून बाहेर आले आहेत. एकीकडे गुंतवणूकदारांचे 800 कोटी अजूनही अधांतरीच असताना डी. एस. कुलकर्णींची मात्र जामिनावर सुटका झाली आहे.


डी. एस. कुलकर्णी पाच वर्षांनंतर तुरुंगाबाहेर


तब्बल पाच वर्षांनंतर डी. एस. कुलकर्णी जामिनावर बाहेर आले आहेत. 2019 मध्ये गुंतवणूकदार आणि बँकांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक झाली होती, यानंतर आता त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. गुंतवणूकदारांचे 800 कोटी अजूनही अधांतरी आहेत, येणाऱ्या काळात ते त्यांना परत मिळणार का? याचं उत्तर अद्याप तरी मिळालेलं नाही.


कुटुंबीयांसह कंपनीतील लोक होते अटकेत


फेब्रुवारी 2018 मध्ये डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुलगा, मेहुणे आणि जावयासह कंपनीतील लोकांना अटक करण्यात आली होती. ज्या कायद्याअंतर्गत त्यांना अटक करण्यात आली होती, त्या कायद्यानुसार जास्तीत जास्त किती दिवस या आरोपींना न्यायालयात ठेवता येतं? हा निकष न्यायालयाने पाहिला. नेमून दिलेल्या काळापेक्षा अधिक काळ लोटल्यानंतर या सर्वांची जामिनावर सुटका करण्यात आली.


गुतवणूकदारांना त्यांचे पैसे कधी मिळणार?


सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे, या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये गुंतवणूकदारांचा एक रुपयाही परत मिळालेला नाही. डी. एस. कुलकर्णी यांच्या एकूण 335 मालमत्ता आहेत. गृह प्रकल्प, मोकळ्या जागा आणि डी. एस. के. ड्रीम सिटीसारखा 300 एकरांमधील प्रकल्प असे विविध प्रकल्प कुलकर्णींकडे आहेत, यातील बहुतांश प्रकल्पांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या लिलावामधील एक रुपयाही गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचत नाही.


मालमत्ता विकून बँकांकडे पैसे वळते


डी. एस. कुलकर्णी यांना अटक झाल्यानंतर नवीन घोटाळ्याला सुरुवात झाली, असा आरोप गुंतवणूकदारांनी केला आहे. डी. एस. कुलकर्णींच्या मालमत्ता कवडीमोल किमतीला खरेदी करायचे आणि मिळालेले पैसे बँकांकडे वळते करायचे, असा प्रकार सुरू असल्याचं गुंतवणूकदार म्हणत आहेत. कारण डी. एस. कुलकर्णींनी जसे गुंतवणूकदारांकडून पैसे घेतलेले, तसेच विविध बँकांकडून देखील घेतले होते.


बँकांकडूनही 1200 कोटींचं कर्ज


डी. एस. कुलकर्णींवर बँकांचंही जवळपास 1200 कोटी रुपयांचं कर्ज आहे. या सर्व प्रकारात बँकांचाही सहभाग असल्याचं पोलिसांना सुरुवातीला आढळून आलं होतं. एका राष्ट्रीयकृत बँकेच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांनाही पोलिसांनी अटक केली होती. सध्या डी. एस. कुलकर्णींच्या मालमत्ता विकून जो पैसा येतोय, तो आधी बँकांना दिला जातोय. ज्या सामान्य गुंतवणूकदारांनी आपल्या आयुष्यभराची कमाई डीएसकेंकडे गुंतवली होती, त्यांना मात्र एक कवडीही मिळालेली नाही. सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करावा आणि डी. एस. कुलकर्णींच्या मालमत्तांचा लिलाव करुन जे काही पैसे येणार आहेत, ते या गुंतवणूकदारांना द्यावे आणि त्यांची देणी भागवावी, अशी मागणी आता होत आहे.


हेही वाचा:


Palghar Crime: विवाहित महिलेवर अत्याचार करून अश्लील व्हिडीओ व्हायरल; जिजाऊ संघटनेच्या बोईसर अध्यक्षावर गुन्हा दाखल