शहापूर : शहापूर (Shahapur) तालुक्यातील कसारा (Kasara) पटकीचापाडा येथे रस्त्याअभावी एका महिलेची वाटतेच प्रसुती झाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान प्रसुतीसाठी या महिलेला पायवाटेने रुग्णालयात (Hospital) नेण्यात येत होते. चांगली वाट नसल्यामुळे रुग्णवाहिका येण्यास या गावामध्ये शक्य नाही. त्यामुळे झोळीतून या महिलेला रुग्णालयात नेण्यात येत होते. दरम्यान याही परिस्थितीमध्ये ती महिला आणि तिचे बाळ सुखरुप असल्याची माहिती देण्यात आली आहे. 


शहापूर तालुक्यातील पटकीचा पाडा हा एक अतिदुर्गम भाग आहे. त्यातच हा आदिवासा पाडा असल्याने या गावामध्ये पुरेश्या सोयी सुविधा नाहीत. तर गावापर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता देखील नाही. दरम्यान या गावामध्ये पक्का रस्ता व्हावा अशी मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहे मात्र अद्यापही या गावात जाण्यासाठी पक्का रस्ता झाला नाही. 


नेमकं काय झालं?


रस्ता नसल्यामुळे येथील रुग्णांना रुग्णालयाचा खडतर प्रवास करावा लागतो. तर त्यांना अनेक अडचणींना देखील सामोरं जावं लागतं. असचं काहीसं या महिलेच्या बाबतीत झालं होतं. गरदोर राहिल्यानंतर तिचे गरोदरपणाचे दिवस भरले होते. रविवार (1 सप्टेंबर) रोजी सकाळी अचाकन तिच्या कळा सुरु झाल्या. त्यानंतर सकाळी 11 वाजताच्या सुमारास तिला कसारा येथील रुग्णालयात दाखल करायचे होते. 


पण पक्का रस्ता नसल्यामुळे रुग्णवाहिकेला येण्यास कोणताही पर्याय नव्हता. त्यामुळे कापडाची झोळी करुन तिला त्या झोळीमधून नेण्यात आलं. रुग्णालयाचं अंतर पार करता करता या महिलेची वाटेतच प्रसूती झाली. पण वाटेत जरी प्रसूती झाली असून सुदैवानं ही महिला आणि तिचं बाळ दोन्हीही सुखरुप आहेत. 


दिला गोंडस मुलीला जन्म 


या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिल्याची माहिती आशा कार्यकर्ती अनीता भवर यांनी दिली. दरम्यान हे बाळ निरोगी असून आता त्यांना पुढील उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे आता रुग्णालयात या महिलेवर आणि बाळावर योग्य उपचार होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 


मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर हे गाव आहे. पण तरीही इथल्या लोकांना प्राथमिक सोयीसुविधांसाठी बरेच हाल सोसावे लागत असल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे शहराचा विकास होत असताना दुसरीकडे अशी खेडीपाडी शासनाकडून दुर्लक्षित होत असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान आता तरी अशा गावांकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


हेही वाचा : 


Nashik leopard : समृद्धी महामार्गावर अज्ञात वाहनाने धडकेत बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू, दहा दिवसात दुसरी घटना